Tuesday, September 14, 2010

अधिक रंगछटा आणि वेगळी दृश्यं

पक्ष्यांना माणसांपेक्षा अधिक रंगछटा दिसतात. तर मग कदाचित त्यांना दिसणारी दृश्यंही वेगळी असू शकतील.
मधमाशीला अतिनील किरण दिसतात, त्याची फिल्म मी पाहिली होती. फुलापानांच्या रेषा न् रेषा तिच्या नजरेतून स्पष्ट दिसत होत्या.
दृश्य वेगळे, रंगछ्टा अधिक वा वेगळ्या, आकलनाची पद्धत आणि गरज वेगळी... यांमुळे पक्ष्यांचे वर्तनही वेगळे होत असणार.
अ‍ॅब्नॉर्मल मानले जाणारे कलावंत आणि नॉर्मल मानली जाणारी व्यवहारी जगातली माणसं यांच्यातही असा काही फरक असेल का? मेंदूबाबत असे संशोधन सुरू आहे; पण डोळे-कान इत्यादी पंचेंद्रियांबाबत काय घडते याचा अभ्यास जगात कुठे सुरू आहे का?
इतरांना आपल्यासारखेच आणि आपल्याइतकेच दिसते, कळते, जाणवते, ऐकू येते, वाटते - असे सरसकट गृहीत धरले, तर त्यातून किती अकारण प्रश्न निर्माण होऊ शकतात.

Saturday, September 11, 2010

एक घायाळ मधाळ हाक

एखाद्या पुस्तकाचं नाव / शीर्षक कसं सुचतं, ही एक गमतीची गोष्ट असते. प्रत्येक पुस्तकाच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडतं. कुहूच्या बाबतीत सांगायचं तर मुळात कुहू हे या कादंबरीतल्या 'नायका'चं नाव होतं. कुहूची पहिली काही पानं मी लिहिली आणि ती लिहितानाच मनाशी हे पक्कं झालं की या कादंबरीचं देखील नाव कुहूच असेल. कारण कुहू हे या कादंबरीतलं केवळ एक महत्त्वाचं पात्र नाहीये, तर  ती एक वृत्ती आहे. त्यामुळे दुसरा काही पर्याय शोधायची गरजच भासू नये, इतकं हे नाव सुरुवातीपासूनच निश्चित झालं. मग ते वेगवेगळ्या कारणांनी अधिक आवडू लागलं. त्यातलं एक कारण होतं की 'कुहू' हा एक 'आवाज' आहे. त्या आवाजाला 'भाषे'चं बंधन नाही. जगातल्या कोणत्याही भाषेत 'कुहू' हा एक शब्द असू शकतो. कुहू या शब्दाला नाद आहे आणि त्यात गोडवाही आहे. 'ब्र' या उच्चारामध्ये धाडस अंतर्भूत आहे, तर 'कुहू' या उच्चारामध्ये आर्तता!. 
कुहू ही एक घायाळ मधाळ हाक आहे , माणसांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणारी!!

Friday, September 10, 2010

कुहू : शीर्षकाची कॅलिग्राफी


'कुहू'चे हे शीर्षक केले आहे श्री. समीर सहस्रबुद्धे यांनी.
एक गाणारा पक्षी... आणि त्याच्याकडे पाठ फिरवून बसलेली एक मुलगी... !
वॉटरकलर आणि ब्रश यांची जादू अक्षरांमधून इतकी सहज लयीत समीरने मांडली आहे की नजरबंदी झाल्यासारखी मी त्या रंगाकाराकडे पाहतच राहिले. गुणवत्ता आणि प्रतिभा एकवटून समीरसारखे कलावंत काम करतात, तेव्हा त्यातून जादू व्हावे तसे काही ना काही निर्माण होत राहते. कुहूचा मूड, स्वभाव, त्याची सगळी कथाच जणू या शीर्षकात अर्कस्वरूप बनली आहे.