Sunday, October 31, 2010

जादूचं वाक्य!

आपली मुलं बुद्धिमान बनावीत असं वाटत असेल, तर तुम्ही त्यांना परीकथा ऐकवा आणि ती सर्वश्रेष्ठ बनावीत असं वाटत असेल तर त्यांना अजून जास्त परीकथा ऐकवा! - आल्बर्ट आइन्स्टाईन 

 

आल्बर्ट आइन्स्टाईन यांचं हे 'बुद्धिमान' वाक्य तसं तर चटपटीत आहे, पण जादूचं वाक्य आहे. ते वाचताच माझ्या चेहर्‍यावर आपोआप आनंद पसरला. पालकांना मुलांकडून काय अपेक्षित असतं याची नस तर वाक्यात पकडली गेली आहेच; खेरीज आपल्याला जे सांगायचं आहे ते व्यवस्थित सांगून टाकलेलं आहे. ही चलाखी खरोखरच बुद्धिमान आहे. :-). परिकथांचं आकर्षण मला कायम वाटत आलेलं आहे. आजही लहान मुलांची 'लायब्ररी' मला जास्त भूरळ घालते. रंगीत चित्रं हे त्यातलं अजून एक आकर्षण.

ब्र प्रकाशित झाल्यानंतर एका व्याख्यानात मी ब्र मधलीच एक शतपाद किड्याची गोष्ट सांगत होते. व्याख्यान संपल्यावर जे लोक भेटायला आले त्यातल्या एका  बाईंसोबत लहान मुलगा होता. त्या त्याला सारख्या दटावत होत्या आणि बोलू देत नव्हत्या. पण तो मुलगा गर्दी ओसरेपर्यंत हट्टानं थांबून राहिला. त्यानं विचारलं," शंभर पायांचा किडा खरोखरच असतो का?" मी हो म्हटलं.  "तो तुम्ही पाहिला आहेत का?" मी पुन्हा हो म्हटलं. मग त्याची एकातून दुसरा अशी प्रश्नांची आगगाडीच सुरू झाली. त्याचा रंग कसा असतो? तो ओरडतो का? कसा आवाज काढतो? ... मी गमतीनं उत्तरं देत होते. तिथूनच परत येण्यासाठी स्टेशनवर जाणार होते म्हणून मी माझी प्रवासी सॅक पाठीवर लावली. त्यानं विचारलं,"या बॅगेत काय आहे?" मी त्याची मस्करी करावी म्हणून सांगितलं,"शंभर पायांचा किडा." झालं. कीडा दाखवा म्हणून तो हट्ट धरून बसला. त्याची आई कासावीस झाली. मी सावरून घेत म्हटलं,"तो बाहेर काढला तर पळून जाईल." " मी त्याला पकडेन." " तुला नाही पकडता येणार. तो चावतो." "मग तुम्ही कसा पकडला? तुम्हाला का नाही चावला?" "मी त्याला हळूच मानेजवळ पकडलं. तो मला चावणारच होता, पण तितक्यात त्याचं लक्ष माझ्या घड्याळाकडे गेलं. तो किती वाजले ते बघत होता, तोपर्यंत मी त्याला पटकन बॅगेत ठेवलं." मी घड्याळात वेळ पाहून घेत उत्तरले. "पण त्याला वेळ कशाला पाहायची होती?" मुलाचे पुढचे प्रश्न सुरू झाले. त्याच्याशी चार तास बोलायलाही मला आवडलं असतं, पण शक्य नव्हतं.  पुन्हा भेटेन असा शब्द देऊन मी निघाले. आणि पुढच्या सगळ्या प्रवासात मी घड्याळात वेळ बघणारा किडा आठवून मनाशी हसत होते. आपल्याला कधीच असे प्रश्न पडत नाहीत, जसे लहानपणी पडायचे. ती कल्पनाशक्ती, ती चौकसबुद्धी आपण गमावून बसलो आहोत, हे फार तीव्रतेनं जाणवलं. त्या प्रसंगापासून बच्चेकंपनी मला प्रिय झाली आणि मुलांना गोष्टी सांगणं फार मजेचं वाटू लागलं. रंग, शब्द, वास, आवाज... प्रत्येक गोष्ट मुलं किती आसुसून तीव्रतेनं अनुभवतात आणि किती लहान लहान गोष्टींमधून आनंद मिळवतात. माझी सगळ्या जगाकडे बघण्याची नजरच मुलांमध्ये राहिल्यानं बदलून गेली. हा बदल झाल्यामुळेच मी 'कुहू'सारखी कादंबरी लिहू शकले.

मराठीतलं असं लक्षात राहिलेलं पुस्तक परीकथांचं नाही, पण 'पर्‍यांच्या कवितां'चं आहे.... विंदा करंदीकरांचं 'परी ग परी.'  पाच-सहा वर्षांची असताना वाचलेलं ते पुस्तक मला आजही त्यातल्या चित्रांसह पाठ आहे.  त्यातली चित्रं पद्मा सहस्रबुद्धे यांची आहेत. पद्माबाईंचीच चित्रं असलेलं अजून एक खूप जुनं पुस्तक मला परवा माझ्या मामांनी त्यांच्या संग्रहातून काढून दिलं. ते आता बाजारात उपलब्ध नाही. पण आजही ते वाचताना फार मजा येते. सई परांजपे यांचं 'हरवलेल्या खेळण्यांचं राज्य.' 

'कुहू'ची बालआवृत्तीची चित्रं पद्माबाईंनी करावीत असं वाटत होतं. पण आता वयोमानानुसार, प्रकृतीनुसार तितकं काम त्यांना झेपणार नाही असं जाणवलं. मग निदान त्यांनी मुखपृष्ठ तरी द्यावं म्हणून मी त्यांच्याशी बोलत राहिले. पण त्यांची प्रकृती साथ देतच नव्हती. "आपण खूप उशिरा भेटलो." अशी खंत त्या सतत व्यक्त करत राहिल्या. तरी त्यांनी 'कुहू' पूर्ण वाचलं, त्याबाबत आमच्या छान गप्पा झाल्या, हेही मला पुष्कळ वाटत राहिलं.

लहानपणी परीकथा वाचताना वेगळी गंमत वाटायची आणि आता प्रौढपणी परीकथा वाचताना वेगळी गंमत वाटते. पण गंमत वाटते, हे खूप महत्त्वाचं. मग 'मोठ्यांसाठी वेगळ्या परीकथा' का असू नयेत? असा प्रश्न मनात आला. रत्नाकर मतकरी यांचं मोठ्यांसाठीच्या परीकथांचं एक लहानसं सुबक पुस्तक आठवलं. पण या कथा पुन्हा 'स्त्री-पुरुष संबंधां'भोवतीच फिरणार्‍या होत्या.

'कुहू' ही केवळ बालकादंबरी म्हणून लिहिता आली असती, पण 'मोठ्यांना नेहमी पर्यायी वास्तवच का द्यायचं? फॅन्टसी का नको?' या विचाराने 'कुहू'चा बाज गोष्टीचा / लोककथेचा राहिला तरी तिच्यात मोठ्यांना आकर्षक वाटतील अशी अनेक अद्भूत जगं हिरव्यागार गालिचासारख्या उलगडणार्‍या जंगलातून समोर येत गेली.लाल रक्त पिवळं उन्ह

उदारहरणार्थ रक्त हा शब्द पाहू.

रक्त हा शब्द आपण पुस्तकात काळा टाइप केलेला वाचतो.
एखाद्या पोस्टरवर तो कॅलिग्राफीसह लाल रंगात छापलेला दिसतो. रक्त हा शब्द निळ्या ( रक्त ) वा हिरव्या (रक्त ) रंगात दिसला तर तितकेच तीव्र वाटेल का त्याविषयी? नाही वाटणार. अशा तडजोडी आपल्याला पटत नाहीत. मेंदू तो रंग मान्यच करत नाही.
एखाद्या व्हीडीओमध्ये, चित्रपटात रक्त वाहताना, ओघळताना दिसतं.
त्याही पलीकडे जाऊन कधीतरी रक्ताचा उष्ण ओला स्पर्श आपण प्रत्यक्ष अनुभवतो. त्याचा वास आपल्या नाकातले केस जाळतो. त्याचा साकळून काळपट होत जाणारा रंग आणि घट्ट गाठी होत जाणारा प्रवाहीपणा डोळ्यांनी अनुभवणं हा विसरता न येणारा अनुभव असतो. अनुभवात सामील होणारा कोणताही शब्द आपली त्याच्यातून सहज सुटका होऊ देत नाही.
लहानपणी खेळताना पडून फुटलेल्या गुड्घ्यातून रेषारेषांनी उमटलेलं रक्त,
भाजी चिरताना कापलेल्या बोटावर उमललेला रक्ताचा टपोरा थेंब,
मासिक पाळी सुरू झाली तेव्हा मांड्यांवर ओघळलेलं अनोळखी उष्ण रक्त,
मार खाताना खोक पडून कपाळाहून भळाभळा वाहणारं बिनकिमतीचं फुकटचं रक्त,
काहीही सहन करत पांढुरका ओठ चावल्यावर नाइलाजानं उगवलेला क्षीण रक्ताचा थेंब,
हाडांच्या मोळीला जगवण्याची धडपड करताना बाटलीतून शरीरात उतरणारं उसनं उपकाराचं रक्त,
संतापानं डोळ्यांत उतरून आलेलं रक्त...
कितीतरी आठवणी.
अश्रूंचं आपल्याला खूप कौतुक असतं लिहिताना, तितकं रक्ताचं असत नाही.
रक्ताविषयी काही बोलणंही भडकपणाचं मानलं जातं.

रक्त कसं लिहायचं? कसं रंगवायचं? माहीत नाही.
मग जे माहीत आहे त्यापासून सुरुवात करून पाहू असा विचार केला.
आणि "उन्ह" हा शब्द झगझगीत पिवळ्या रंगात लिहून पाहून मी सुरुवात केली.
दीपतात ना डोळे हे उन्ह वाचताना?
Friday, October 29, 2010

पांगळ्याला पाय फुटावेत तसं वाटतं...

माणसांना भरभरून प्रेम करता आलं पाहिजे.
आणि त्यासाठी त्यांना सकारात्मक उर्जा लाभली पाहिजे.
जी उर्जा हिरवीगार पानं देतात, रंगबिरंगी फुलं देतात, पक्षी-प्राणी देतात. रंगाने, तजेल्याने, जिवंतपणाने... त्यांच्या नुसत्या असण्या-दिसण्यानेच आपली नजर बदलते. श्वासाची लय बदलते. त्वचेचा पोत बदलतो. मन बदलतं. सुंदर काही अनुभवलं की त्याचं प्रतिबिंब आपल्या आतबाहेर असं उमटतं. आपल्या डोळ्यांत, चेहर्‍यावर, सर्वांगावर झळकतं. आपल्या हालचालीतून, बोलण्या-वागण्यातून उमलून यायला लागतं. आपण सुंदर दिसायला लागतो. आपल्यातला कुरूप भाग आपल्याला जाणवतही नाही. त्या बटबटीत देठावर, त्याच्या बळावरच एक इवलंसं देखणं फूल उमलून निवांत झुलू डुलू शकतं. आपला सुगंध दूरवर पसरवू शकतं. फुलांचे हे निळे जांभळे लाल केशरी पांढरे पिवळे दिवे किती प्रकाश पसरवतात. इवल्या इवल्या अवकाशाचे तुकडे उजळवतात. प्रसन्न करतात. सांगतात की जग सुंदर आहे.
मग माणूस आपले शब्द, आपले रंग, आपले सूर, आपले स्पर्श वापरून आपल्या मनासह आपल्या आसपासचा अवकाश उजळवू शकत नाही का?
प्रेमात प्रचंड जादू असते.
प्रिय व्यक्तीचा खूप दूरवरून नुसता आवाज कानी पडला तरी पांगळ्याला पाय फुटावेत तसं वाटतं.
ही उत्कटता अनुभवायला माणसं का संकोचतात? प्रेम या नुसत्या शब्दानंही का आक्रसतात?
....................
कुहू सारखा एक इवला पक्षी मानुषी नावाच्या मानवी मुलीच्या प्रेमात पडतो, तेव्हा असे सारे प्रश्न त्याला पडणारच.

Thursday, October 28, 2010

पुस्तकं निर्णय घ्यायला मदत करतात, ती अशी...

वॉल्ट डिस्ने वर यशवंत रांजणकर यांनी लिहिलेलं पुस्तक वाचत होते. कुहूचं काम सुरू असतानाच ते हाताशी आलं होतं. त्यामुळे 'कर्ज' या गोष्टीकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. पुस्तकं एखादा निर्णय घ्यायलाही मदत करतात ती अशी.
त्यातली दोन-तीन विधाने मला महत्त्वाची वाटली, ती अशी आहेत...

० "लोक ज्या जगात राहतात, ते त्यांना माझ्या पार्कमध्ये असताना दिसता कामा नये. इथं आपण सर्वस्वी वेगळ्याच जगात आहोत, असंच त्यांना सतत वाटत राहिलं पाहिजे. " - हे वाक्य वाचलं आणि 'कुहू'मध्ये माणसांचं जग वगळून निव्वळ जंगल दाखवण्याचा निर्णय मला पटला.
'कुहू'चं एक वाचन मी उमा कुलकर्णींकडे केलं होतं. तेव्हा विरुपाक्ष कुलकर्णी म्हणाले होते की, "माणसांच्या जगात त्या धुरात, गोंगाटात, कोलाहलात आम्हांला यायचं नाहीये. कशाला त्या कुहूला तेवढ्यासाठी शहरात आणतेस?"
आणि मग कुहू शहरात येतो हा प्रसंग तर तसाच ठेवला, पण जागा बदलली आणि कुहू मानुषीला जंगलातल्या डॉरमिटरीतच भेटतो, असा बदल केला.
हा बदल करण्यामागे अजून एक कारण होतं ते चित्रशैलीचं. शहरात हा प्रसंग 'कॅरिकेचर्स' सारखा झाला होता. तीव्र उपरोध या कादंबरीच्या बाकीच्या भाषेशी विसंगत आहे, हे ध्यानात आलं. यातली गंमत अशी की ते ध्यानात येण्याला माझी ऑइल कलर्स मधली चित्रं निमित्त ठरली.
डिस्नेनं म्हटलं होतं," कल्पना आणि वास्तव यांच्या दरम्यान उभं असताना आपल्याला एकाच वेळी दोघांनाही कवेत घेता आलं पाहिजे. कला आणि विज्ञान यांनी एक होण्याची वेळ आली आहे." 
कुहूचं लेखन पूर्ण झाल्यानंतर निर्मितीचं काम करताना या शब्दांचा पडताळा सतत येत होता.
अशा लोकोत्तर माणसांची चरित्रं पुढच्या अनेक पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरतात.


Wednesday, October 27, 2010

वागणं आणि वर्तन

माणसाचं वागणं हे माणसाचं वर्तन बनायला सुरुवात होते, ती त्याच्या 'विकासा'ची निदर्शक मानली जाते. मात्र या तथाकथित विकासाच्या प्रक्रियेत आपण आपली नैसर्गिक सहजता कशी गमावून बसतो, हे माणसाच्या ध्यानातही येत नाही.
एकदा एका कॉन्फरन्सला गेलेली असताना टी-ब्रेक मध्ये सारे गप्पा मारत होते, तेव्हा मी खळखळून हसले आणि सगळे दचकून माझ्याकडे पहायला लागले. मी दुर्लक्ष करून माझ्या गप्पा सुरू ठेवल्या. थोड्याच वेळात एक आसामी भाषेतले समीक्षक आणि त्यांची पत्नी माझ्याजवळ ओळख करून घ्यायला आले. मग त्या बाई म्हणाल्या,"मी आयुष्यात पहिल्यांदाच अशी इतकी खळखळून हसणारी बाई पाहिली."
मी म्हटलं,"लोक वेडी म्हणतात इतकं हसल्यानं."
त्या उत्तरल्या,"म्हणू देत. पण तू हसलीस तरी मला किती बरं वाटलं म्हणून सांगू... मला कधीच असं हसता येणार नाही."
त्यांचा स्मित हास्य करत बाजूला उभा असलेला नवरा म्हणाला,"मलाही! म्हणजे आम्हांला कुणी अडवलं नाहीये. आणि आम्ही एक सुखी जोडपं आहोत. तरी आज तुला हसताना पाहून हे आमच्या पहिल्यांदाच लक्षात आलं की आम्ही काय मिस करतोय. म्हणून तुझी ओळख करून घेतली."
शिष्टाचारांचं जेव्हा ओझं व्हायला लागतं, तेव्हा माणसांना ते फेकून द्यावं वाटतंच. शिष्टाचारांपायी माणसं इतकी 'कॉन्शस' होतात की आपले साधे सहज आनंद गमावून बसतात. हसणं, बोलणं, रडणं, चिडणं, नाचणं, गाणं... सगळ्याचं 'शास्त्र' बनतं. चौकट बनते. आणि त्या चौकटीत स्वतःला कोंबून बसवण्यासाठी माणसं स्वतःला आणि दुसर्‍यांनाही कापून, कातून, कोरून काढायला लागतात.
अशा विचारांमधून मला एकदा टोकाचं वाटलं की,"नैसर्गिक वागणं हेच आता सभ्य माणसांना अनैसर्गिक वाटू लागलं आहे."
मी 'कुहू'च्या जवळ जाण्याची सुरुवात याच भावनेपासून झाली.
"मैत्री, आपुलकी, प्रेम अशा भावना व्यक्त करणार्‍यांना आता समुपदेशकाकडे किंवा मनोरोगतज्ञांकडे जा, असं सांगण्याचे दिवस आले आहेत." हा विचार मन उदास करून टाकणारा होता.