Tuesday, June 19, 2012

परीक्षण - संजय भास्कर जोशी ( ललित, जानेवारी २०१२ )

पुस्तक परीक्षण, समीक्षा, पुस्तक परिचय या सगळया सगळयाच्या पलीकडे जाऊन लिहायला हवं कविता महाजन यांच्या 'कुहू'विषयी. तसं पाहिलं तर हे एक दोनशे पानी पुस्तक. एक कादंबरी. छान आर्ट पेपरवर छापलेली. पानोपानी चित्रं असलेली. अत्युत्तम निर्मितिमूल्य असलेली. बहुतेक मराठीत प्रथमच त्रिमिती (थ्री डायमेन्शनल) आणि अतिशय आकर्षक मुखपृष्ठ असलेली. लहान मुलांना आकर्षित करेल अशी, पण मोठ्यांनाही विचारात टाकेल अशी... आणि त्यासोबत याच पुस्तकाची डीव्हीडी. ज्यात अ‍ॅनिमेशन, मधुर आवाजातलं वाचन आणि उत्तम संगीत आणि काव्यगायन असल्यानं सुरेल ओघात पुढे सरकणारी... पण, इतकंच? इतकंच आहे हे सगळं? छे. मला विचाराल तर 'कुहू' हे एका कलंदर, मनस्वी कलावंताचं एक खुळं आणि खुळावणारं स्वप्न आहे. पण अशा स्वप्नांचं व्यावहारिक जगात आणि बाजारात तितक्याच आत्मीयतेनं स्वागत आणि मूल्यमापन होतं का?
कविता महाजन यांना ही निर्मिती करताना हे सगळं जाणवलं का नसेल? खरं उत्तर द्यायचं तर नसेल जाणवलं. कारण अशा व्यावहारिक जाणीवा बाळगल्या तर अशी मनस्वी निर्मिती शक्यच नसते. गुणात्मक मूल्यामापन घटकाभर बाजूला ठेवा, पण या उत्कट मनस्वी निर्मितीबíल कविता महाजन यांना कुर्निसात. एकदम दिलसे कुर्निसात! असलं रूपक काव्य, हो, कविता महाजन याला भले कादंबरी म्हणो पण यात मला एक रूपकात्मक गीतकाव्यच दिसतं, जे अलीकडे दुर्मिळ होत चाललंय. तर असं मनस्वी गीतकाव्य अशा प्रकारे निर्माण करायला खुळेपणाच हवा. असो. सांगायचा मुद्दा असा, की कविता महाजन निर्मित 'कुहू' या निर्मितीला सामोरं जायचं तर तशीच मनस्वी उत्कट मानसिकता आपलीही हवी.
मी याला निर्मिती म्हणतोय ते जाणीवपूर्वक. कारण हे काही केवळ एक पुस्तक नव्हे. केवळ मलिटमीडिया डीव्हीडी नव्हे. साहित्य, चित्र, संगीत अशा अनेक कलांचे ते एक कलात्मक आणि प्रातिभ फ्यूजन आहे. हा प्रयोग अपूर्व आहे. त्याचे गुणात्मक मूल्यमापन बाजूला ठेवूया घडीभर, पण आपणच कदाचित कमी पडतो, या आणि अशा प्रयोगाला दाद धायला, हे कबूल करूया.
आता थोडं प्रॅक्टीकल बोलतो. या प्रयोगाचं प्रेझेंटेशन आणि मार्केटिंग करताना थोडी गडबड झालीच. अर्थात हे काही साहित्यविश्वाच्या करंटेपणाचं समर्थन नव्हे. आम्ही दाद देण्यात कमी पडलो हे लपवण्यात अर्थ नाही. या सगळयाचं एकत्र बंडलिंग करून पंधराशे रुपयाची (एरवी खरं तर कमीच, पण मराठी खिशाला -) भली मोठी वाटणारी किंमत याला चिकटवलीत. असो.
काय आहे हे 'कुहू' प्रकरण? म्हटलं तर ही एक भावमधुर कहाणी आहे. प्रेमकहाणी आहे. प्रेम या अतिमधुर भावनेच्या मुळापर्यंत पोचणारी भावविभोर कहाणी आहे. एक पक्षी आणि एक माणूस यांच्यातल्या मधुर प्रेमाची गोड गोष्ट आहे. पण म्हटले तर याहून बरेच काही आहे. एक अतिसुंदर रूपककथा आहे. कलावंताच्या मानसिकतेची कैफियत आहे. पण त्या रूपकाचे नंतर बघू, आहे त्या स्वरूपात ही एक फार गोड गोष्ट आहे. 'कुहू' या कोकिळ पक्ष्याने आपले सारे आदिम कोवळेपण, निरागसपण जपत प्रेम या भावनेला दिलेले अतिरम्य काव्यरूप म्हणजे कविता महाजन यांची ही 'कुहू' कादंबरी होय. प्रेमापोटी एखादा कुणी आपले स्वत्व मिटवतो आणि (अर्थातच) शेवटी मातीमोल (इथे अक्षरश:) होतो त्याची ही कहाणी आहे. कुहू नावाच्या कोकिळ पक्ष्याची आणि मानुषी नावाच्या मुलीची प्रेमकहाणी आहे.
कविता महाजन ही 'ब्र' या कादंबरीमुळे प्रसिद्ध झालेली लेखिका असली तरी मुळात ही संवेदनाशील कवयित्री आणि चित्रकारच आहे हे या कादंबरीच्या निमित्ताने अधोरेखित झाले ते बरेच झाले. 'कुहू'च्या निमित्ताने कविता महाजन यांनी केलेली चाळीस-बेचाळीस तैलरंगातली पेंटिंग्ज बघताना हे जास्तच जाणवते. आणि या कादंबरीतली गीते वाचताना किंवा ऐकताना त्यांच्यातली कवयित्री भावते.
झुळूक आली इवली इवली
तिचेच झाले गाणे
गाण्यासोबत गाण्यामधुनी
अपुले येणे जाणे

अशा ओळीमधून किंवा
मनात काही मावत नाही
येते उसळुनी वरती
मनात मावेना आभाळ
मावत नाही धरती

अशा ओळींतून कविता महाजन यांचे काव्यव्याकुळ मन जाणवत राहते. या कादंबरीत जागोजागी अशा सुरेख अन सुरेल कविता येत राहतात. आणि चिमुकला कुहू नावाचा कोकिळ आणि मानुषी ही तरुणी यातले नाते सुरेल करत राहतात. मोह आवरत नसल्याने एक गोष्ट इथेच नमूद करतो. याच कादंबरीबरोबर जी दृक-श्राव्य डीव्हीडी मिळते त्यात कविता महाजन यांच्या या कादंबरीतल्या कवितांना जे सुमधुर श्राव्य रूप दिले आहे ते विलक्षण सुरेल आहे. उदाहरणार्थ, या ओळी -
रे निळया आकाशी स्वरा,
थांब ना,
बोल ना जरा...
हे रितेपणाचे काहूर
अंतरी तोल ना जरा

या ओळींना आरती अंकलीकरांनी जे स्वररूप दिले आहे ते व्याकूळ करणारे आहे. घायाळ करणारे आहे. आणि त्याचबरोबर मन उन्नत करणारा अनुभव देणारे आहे. (या डीव्हीडीमधला दृक भाग मात्र प्रभाव टाकत नाही. डोळे मिटून ऐकले तरी ही डीव्हीडी उत्तम आनंद देते. उलट तीच तीच चित्रे पुन्हा पुन्हा पाहून कंटाळाच येतो. असो.) म्हटले तर ही पक्ष्याची, सृष्टीची, निसर्गाची गोड गोष्ट आहे. म्हटले तर मनस्वी कलावंताच्या व्याकूळ करणार्‍या दुर्दैवाची कहाणी आहे. रूढार्थाने रूपककथा नाही म्हणणार मी हिला. कारण यात सृष्टी, प्राणी, पक्षी यांच्यावरचे मानवी भावभावनांचे आणि स्वभावाचे आरोपन अपरिहार्य नाही. कुहू हे कशाचे रूपक आहे आणि त्या रूपकाद्वारे कविता महाजन काय सांगू पाहतात त्याचे अन्वयार्थ लावणे हा ज्याच्या त्याच्या प्रतिभेचा आणि मगदूराचा प्रश्न आहे.
मला जाणवलेले एक वैशिष्ट्य सांगतो. ते आणि तेच निर्णयक आहे असा अर्थातच दावा नाही. पण मला असे जाणवले, की कुहू हा मधुर गाणारा कोकिळ मानुषीच्या प्रेमाखातर आपले पक्षीपण आणि गाणे या दोन्हीचा त्याग करून सृष्टीदेवतेच्या आशीर्वादाने न गाणारा माणूस होतो यातच या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत दडला आहे. प्रेम आणि त्यातून येणारे समर्पण आणि शरणागतता हा या कादंबरीचा एक विषय आहे. (प्रेमातून येणारे समर्पण सर्जनशील असते तर स्वत्वच मिटवणारी शरणागतता अंतिम र्‍हासाचे बीज असते असे मला वाटते.) कारण माणूस झालेला आणि त्यासाठी आपल्या गाण्याचा बळी देणारा कुहू मानुषीला आवडेल ही कुहूची अपेक्षाच चूक आहे. त्यामुळे या कहाणीचे आधी भावमधुर आणि भावविभोर असणारे रूप शेवटी भलतेच भाबडे आणि बाळबोध होते. कुहूला सहानुभूती देण्याच्या नादात लेखिकेला त्यात मानव आणि निसर्ग, मानवाचे निसर्गावर आक्रमण वगैरे आदर्शवादी भाग आणणे अटळ होते. ते तर जास्तच बाळबोध होत जाते. शेवटी वैतागलेली मानुषी त्रासून कुहूला विचारते, "काय पाहिजे होतं तुला?" तेव्हा कुहू म्हणतो ते महत्त्वाचं आहे. कुहू म्हणतो, "काही नाही मानुषी. तुला जे वाटतंय ते काहीच नाही. तुम्हा माणसांच्या जगातल्या देवाण-घेवाणी मला कधीच पाहिजे नव्हत्या. तुमच्या जातीपाती, धर्म, लग्न, पैसे कमावणं... या सगळयात मला काही रस नव्हता... मला फक्त गायचं होतं मानुषी... अधिक चांगलं गायचं होतं... मला माझं गाणं आभाळासारखं अवघ्या पृथ्वीवर पसरवायचं होतं...!"
या कहाणीची मेख इथे आहे. कारण कुहूचं खरं प्रेम आपल्या गाण्यावर आहे का त्याच्या पक्षी असतानाच्या गाण्यावर भाळलेल्या मानुषीवर आहे हेच कुहूला समजत नाही, किंवा ठरवता येत नाही. आणि तिथेच कुहूच्या दुर्दैवाची बीजं पेरली जातात. अशा प्रेमकहाणीचे दुर्दैवी अंत अटळ असतात. खरे तर त्या दुर्दैवाला माणसाच्या स्वार्थी आणि मतलबीपणाचे (जे खरे असले तरी) रंग देणे निष्फळ तर असतेच पण निरर्थक असते. कारण कुहू म्हणतो तसं त्याला फक्त चांगलं, अधिक चांगलं गाऊन आभाळासारखं पृथ्वीवर पसरवायचं होतं तर त्याने कधीच मानुषीला मिळवण्यासाठी आपल्या गाण्याचा बळी नसता दिला. नकळत अशी ही कहाणी समाजाच्या असंवेदनशीलतेबरोबरच कलावंताच्या मूल्यर्‍हासाची होत जाते. मानुषीच्या निमित्ताने माणूसजातीवर उपरोधाचे कोरडे ओढणारा कुहूच स्वत: स्खलित आहे, स्वप्नच्युत आहे हेच क्रूर वास्तव आहे. कुहूचे अंतस्तर असे जखमी करणारी सत्ये समोर आणतात. ते लेखिकेला असेच अभिप्रेत असतील असे मात्र नव्हे. कारण लेखिकेची विनाअट सहानुभूती कुहूलाच आहे.
पण तरीही नकळत कलावंताच्या मूल्यर्‍हासाचे वास्तव देखिल समोर येतेच. या पुस्तकाची ही पस्तुरी आहे. कलावंत आणि समाजाच्या नात्याबाबतच्या चिंतनाला श्रीमंत करणारे हे वळण आहे. सत्य हेच आहे, की इथे मानवजातीचे प्रतिनिधित्व करणारी मानुषी खलनायिका नाही. उलट ज्या क्षणी कुहू आपले स्वत्व असे गाणेच तिच्या मोहापायी देऊन टाकतो, त्याच क्षणी तो तिच्या नजरेतून कलावंत म्हणून उतरतो. हेच ती त्याला परोपरीने सांगतेय. काय चुकले मानुषीचे? तिने त्याच्या गाण्यावर प्रेम केले. पण तोच गाणे गमावलेला काळा विद्रुप माणूस म्हणून समोर आल्यावर तिने काय म्हणून त्याच्यावर प्रेम करावे? लेखिकेची आणि इतर पक्ष्यांची सहानुभूती असेना का कुहूला. पण मानुषीचे काय चुकले? आणि हेच प्रतिकात्मक अर्थाने घेऊन बघा. मानुषी ज्याचे प्रतीक आहे त्या समाजाचे लांगुलचालन करणारे किती कलावंत असे स्वत्व विसरून घसरत गेले त्याची उदाहरणे का धायला हवी? कुहू हे अशा घसरलेल्या, स्खलित कलावंतांचे प्रतीक आहे हा अन्वयार्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. वाचकाच्या सर्जनाचे ते लक्षण आहे.
वाचकहो, हे नीट लक्षात घ्या. ज्या क्षणी लेखक कादंबरी लिहून पूर्ण करतो त्या क्षणी लेखकाचा आणि कादंबरीचा संबंध संपला. आता उरतो तो प्रातिभ आणि सर्जनशील संवाद फक्त वाचक आणि कलाकृतीमध्ये, तेव्हा लेखिका कुहूला सहानुभूती देतेय वगैरे भाग महत्त्वाचा नाहीच, तो सोडूनच द्या. आपणच कलाकृतीचे मर्म, गाभा शोधायला हवा. आणि कुहूचा गाभा कलावंताचा मूल्यर्‍हास हा आहे. उत्तम कलाकृती काही वेळा लेखकाच्या दोन पावले पुढे जाते हा तर माझा आवडताच सिद्धांत. असो. अर्थात त्याचे संपूर्ण श्रेय मात्र कविता महाजन यांच्या प्रतिभेला द्यायला हवे.
ही देखणी निर्मिती अंमळ (हे 'अंमळ' केवळ उपचार म्हणून म्हटले, खरे तर चांगलीच) महाग आहे हे मात्र खरे. त्याबाबतीत एखाद्या अधिक व्यावसायिक (प्रोफेशनल या चांगल्या अर्थाने) प्रकाशकाचे साहाय्य घेऊन काही करता आले तर फारच उत्तम. शिवाय पुस्तक आणि डीव्हीडी असे दोन्ही एकत्रच घ्यायला लावणेही जरासे खटकते. स्वतंत्र कलाकृती म्हणून दोन्ही विलक्षण सुंदर आहेत. या निर्मितीमध्ये अनेक कलावंतांचे हात गुंतलेले आहेत. मग ते धीरेश जोशी, रीमा लागू यांच्यासारखे कसलेले अभिवाचक असतील, आरती अंकलीकर यांच्यासारख्या अभिजात गायिका अन संगीतकार असतील किंवा इतर अनेक दृक-श्राव्य-मुद्रण क्षेत्रातले कलावंत असतील. नामावळी देण्यात अर्थ नाही, पण हे एक सुंदर टीमवर्क आहे. अर्थातच या सार्‍यांची कप्टन म्हणून कविता महाजन यांचे खास अभिनंदन करायला हवेच.
एका मनस्वी प्रयोगाला दाद म्हणून आपण अगदी आवर्जून (विकत घेऊन!) ही अनुभूती घ्यायला हवी.
०००