मुलाखत

मराठीमध्ये अपार साहित्यनिर्मिती झाली आहे. हे साहित्य वाचताना डोळ्यांसमोर त्यातली दुनिया आपोआप साकारत जाते. ती त्या शैलीची ताकद असते. पण हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेतली पुस्तकं, वर्तमानपत्रं जशी हालतात-बोलतात तसं मराठीतही एखादं पुस्तक असतं तर.. अशी फॅन्टसीची दुनिया
कुहूच्या निमित्ताने मराठीत अवतरत आहे.
ही मल्टीमीडिया कादंबरी मराठीतच नाही तर
भारतातल्या पुस्तकांच्या दुनियेमध्ये
माइलस्टोन ठरेल. शर्मिला फडके
कविता महाजनांच्या ‘कुहू’ या मल्टिमीडिया कादंबरीच्या प्रोजेक्टबद्दल ऐकताना मला हॅरी पॉटरची पुस्तकं आठवली आणि ती वाचत असताना माझ्या मनात आलेले विचारही आठवले..
हॅरी पॉटर वाचत असताना आपल्या नजरेसमोर सतत एक विलक्षण इमेजरी साकार होत असते. त्यात ‘द डेली प्रॉफेट’ नावाच्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधली माणसं हलत, बोलत, चालत असतात. ते बातम्यांना अनुरूप एक्स्प्रेशन्स देतात किंवा त्यातले पालक विझली हाऊसच्या होस्टेलवर राहाणाऱ्या आपल्या मुलांना जेव्हा पत्राद्वारे ओरडायचं असतं तेव्हा त्यांना पत्रांमधून हॉवलर्स पाठवतात. पत्र उघडलं की त्यातल्या हॉवलर्सद्वारे आई किंवा वडील आपल्या मुलांना प्रत्यक्षातच जोरात ओरडताना दिसत असतात. विझली हाऊसमधल्या घडय़ाळाचे काटे त्या-त्या वेळी घरातली प्रत्येक व्यक्ती कुठे आहे, काय करतेय हे दाखवत असतात. फोटो किंवा पोस्टर्समधली दुनियाही हलती, बोलती असते. हॅरी पॉटर पुस्तक वाचताना हे सारं नजरेसमोर उभं करून बघताना असं नेहमी वाटायचं की, हॅरीच्या जादुई दुनियेतले पेपर, पुस्तकं जशी त्यांना वाचता वाचता प्रत्यक्ष दृश्यानुभव देतात तसे आपल्यालाही हे पुस्तक वाचताना मिळायला हवे होते आणि नंतर जेव्हा ‘कुहू’चा हा सारा प्रोजेक्ट कविताने कसा साकारला, प्रोजेक्टची पूर्तता ती कशी करत गेली हे तिच्याशी आणि तिच्या टेक्निकल टीमशी बोलत असताना समजत गेलं तेव्हा आठवला तो वॉल्ट डिस्ने. 'If You Can Dream It, You Can Do it!' म्हणणारा वॉल्ट डिस्ने.
कविता महाजनांच्या फेसबुकावर ‘कुहू’बद्दल बरेच दिवस वाचत होते. ‘कुहू’ ही कादंबरी त्या सध्या लिहीत आहेत आणि ती मल्टिमीडिया कादंबरी आहे हे त्यातून समजलं होतं. पण मुळात मराठी कादंबरी मल्टिमीडिया आहे म्हणजे नेमकं काय हे कळत नव्हतं. कदाचित ‘फाईंडिंग नेमो’च्या धर्तीवर त्यांच्या आगामी कादंबरीवर काही अ‍ॅनिमेशन फिल्म बनणार असावी किंवा पुस्तकं, कादंबऱ्यांच्या ऑडिओ आवृत्त्या निघतात तशी ‘कुहू’ची व्हिडीओ आवृत्ती निघेल ज्यात ऑनलाईन कॉमिक्ससारखी टेक्स्ट आणि अ‍ॅनिमेशन्स असतील इतकाच विचार माझ्या टेक्निकली चॅलेन्ज्ड मेंदूने केला, पण मग त्यांच्या फेसबुकवरच्या अपडेट्समध्ये आज ‘कुहू’मधल्या गाण्यांचं रेकॉर्डिग झालं किंवा ‘कुहू’साठी पेंटिंग्ज रंगवली, ‘कुहू’साठी दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांचे फोटोग्राफ्स किंवा व्हिडीओज मिळाले असं वाचताना हे मल्टिमीडिया प्रकरण ऑडिओ बुक्स किंवा अ‍ॅनिमेशन फिल्मपेक्षाही काहीतरी भारी आहे असं वाटायला लागलं. त्यातूनच मग जेव्हा कविता महाजनांनी ‘कुहू’ या पहिल्या भारतीय मल्टिमीडिया कादंबरीचा प्रोमो आणि वेबसाईटच्या लॉन्चिंग समारंभाला यायचं आमंत्रण दिलं तेव्हा मनात हे रंगीत कुतूहल घेऊनच तिथे पोचले.
‘कुहू’चा प्रोमो पाहणं किंवा असं म्हणूयात अनुभवणं हा एक अनोखा अनुभव ठरला.
दाट, गर्द जंगलांतील हिरव्यागार वृक्षांमधून खोल, खोल आत आपल्याला घेऊन जाणारा कॅमेरा, पाश्र्वभूमीवर शास्त्रोक्त रागदारीवरील सुरेल स्वर, मग फांद्यांच्या दुबेळक्यात आपले कृष्णनिळे पंख घेऊन विसावलेल्या एका सुंदर पक्ष्याचे तैलचित्र, त्याच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या लकेरी घेताहेत लयबद्ध शब्दरूप.. खालच्या गवतावर नृत्यमग्न सारस युगुलाची जोडी स्वत:तच मग्न आहे.
जेमतेम ५० सेकंदांचा हा प्रोमो पाहून संपल्यावरही मला दीर्घकाळ त्यातलं पेंटिंग आठवत राहिलं, गाणं मनात रु ंजी घालत होतं, कुहूची सुरेल शीळ मनात घुमत होती, नृत्यमग्न सारस पक्षांचा व्हिडीओ नजरेसमोरून हटत नव्हता. मल्टिमीडिया तंत्रज्ञानाचा हा प्रभाव होता नक्कीच.
‘कुहू’ ही मल्टिमीडिया कादंबरी आहे म्हणजे नेमकं काय आहे.. अगदी थोडक्यात सांगायचं तर ‘कुहू’ हे एक टीव्ही अथवा संगणकावर बघत ऐकण्याचे पुस्तक आहे. यात मजकूर ऐकताना वाचकाला समोर अनेकविध गोष्टी दिसत राहतील. त्या गोष्टी म्हणजे चित्रं, छायाचित्रं, कॅलिग्राफी, व्हिडीओ आणि अ‍ॅनिमेशनसुद्धा. ऐकताना कथानकाला गाणी, वाद्यसंगीत, पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज यांची जोड असेल. अनेक कलांचा संगम असलेलं आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कलात्मक वापर करून बनलेलं हे मिश्र माध्यमातील हे ‘पुस्तक’. भारतीय साहित्यातला हा पहिलाच प्रयोग. त्या दृष्टीनेही या प्रयोगाचे एक वेगळे महत्त्व नक्कीच वाटते.
‘कुहू’मध्ये कविता महाजन यांनी स्वत: काढलेली ४३ ऑइल पेंटिंग्ज आहेत, आरती अंकलीकरांनी स्वरबद्ध केलेली शास्त्रोक्त रागदारीवर आधारित सुरेल गाणी आहेत, पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज आहेत, नृत्यमग्न सारस पक्षांचा दुर्मिळ, विलोभनीय व्हिडीओ आहे, अशा दृश्यांचे इतरही व्हिडीओज आहेत, दत्तरजा दुसानेंची अर्थाला लपेटून असलेली लयबद्ध कॅलिग्राफी आहे, समीर सहस्रबुद्धेंची अ‍ॅनिमेशन्स आहेत. या इतक्या साऱ्या दृश्यकला असणाऱ्या प्रोजेक्टला पुस्तक का म्हणायचं हा प्रश्न स्वाभाविकच होता. याला पुस्तक म्हणायचं कारण, यात शब्द सर्वाधिक महत्त्वाचे, पायाभूत आहेत. शब्दांना जास्त तीव्र बनवण्याचं काम इथे इतर कला करतात. शब्द येताना आपले रूप, रंग, नाद, लयाची अंगभूत संवेदना सोबत घेऊनच या कथानकात येतात. विविध दृश्य माध्यमं आपोआप एकमेकांमध्ये गुंतत रहातात. त्यांचं एकत्रित एक माध्यम बनतं. ‘कुहू’च्या संचात डीव्हीडीसोबत पुस्तकही आहेच. अर्थात हे पुस्तक असेल संपूर्ण रंगीत, आर्ट पेपरवर छापलेलं आणि 3D मुखपृष्ठ असलेलं.
मल्टिमीडिया हे आजच्या युगाचे तंत्रज्ञान आहे. आजच्या तरुण पिढीच्या सवयीचे, अगदी रोजच्या वापरातले आहे. इंग्रजी माध्यमात शिकलेली आजची पिढी मराठी वाचत नाही, अशी आरडाओरड सतत होत असते. ती खरीही आहे. भाषा बोलता-ऐकता येते, समजू शकते; मात्र लिपी वाचण्याची सवय मोडलेली आहे, अशा वाचकांना पुस्तकाकडे पुन्हा वळवण्याचं काम मल्टिमीडियाद्वारे होऊ शकेल. तरुण आणि टेक्नोसॅव्ही वाचकांना ‘कुहू’ची प्रेमकथा निश्चितच अद्भुत अनुभवाच्या जगात घेऊन जाईल. सुमारे दीड कोटी मराठी लोक आज इंटरनेट वापरतात. त्याखेरीज केवळ संगणक वापरणाऱ्यांची आणि डीव्हीडी प्लेअर वापरणाऱ्यांची संख्या तर खूप मोठी आहे. तीन भागांतली ही कादंबरी तैलरंगातील चित्रांसह बघणे आणि शास्त्रीय संगीतासह ऐकणे हा अनुभव कोणत्याही वयाच्या अभिजात वाचकाला वेगळा आनंद देणारा ठरेल.
‘कुहू’चे ३-डी मुखपृष्ठ
‘कुहू’ इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये या महिन्यात बाजारात येईल. ‘कुहू’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंगची सोय आहे. ‘कुहू’च्या संचात एक पुस्तक आणि एक डीव्हीडी असेल. त्याची किंमत आहे रु . १५००/-. सवलतीच्या दरामध्ये ही किंमत असेल
रु . ११२५/-. ‘कुहू’च्या बाल-आवृत्तीची किंमत आहे रु . १०००/- सवलतीच्या दरामध्ये किंमत रु . ७५०/-.
‘कुहू’च्या कथानकामध्येच ‘कुहू’च्या मल्टिमीडिया स्वरूपाची बीजं रु जलेली आहेत. जंगलात राहाणाऱ्या कुहू या कोकीळ पक्ष्याची ही रूपक कथा.
‘कुहू’ ही मल्टिमीडिया कादंबरी असल्याने साहजिकच दृश्यमाध्यमाला फार महत्त्व आहे. कथानकाला अनुसरून असलेले आणि नैसर्गिक स्वरूपात शूट केलेले प्राण्या-पक्ष्यांचे, निसर्गदृश्यांचे व्हिडीओज, फोटोग्राफ्स मिळवणे ही आव्हानात्मक गोष्ट होती. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटचा सुयोग्य वापर कविताने त्यासाठी करून घेतला. दीड-दोन वर्षांपासून ते मिळवण्याचे प्रयत्न चालू होते. स्नेही परिचितांच्या खासगी संग्रहातले अक्षरश: हजारो फोटोग्राफ्स आणि व्हिडीओज नजरेखालून घातले त्यासाठी.
प्राणी-पक्षी आणि निसर्गदृश्यांचा खजिना समोर असला तरी ‘कुहू’साठी काही नेमक्या वैशिष्टय़ांची आवश्यकता होती. उदा. खंडय़ा पक्षी ५-६ वेगवेगळ्या रंगांचा असतो किंवा राघूही अनेक असतात, पण कादंबरीत त्यांची जशी वर्णनं केली होती तसेच ते प्रत्यक्षात दिसायला हवे होते. शिवाय वेगवेगळ्या फोटोंमध्येही पक्षी-प्राण्यांची कंटिन्युटी राखणं गरजेचं होतं. ‘कुहू’मधल्या सशाच्या अंगावर वितळलेलं चॉकलेट सांडल्यासारखे डाग आहेत त्यामुळे तो ससा पाठीवर तशाच प्रकारच्या ठिपक्यांचा मिळणं खूप अवघड होतं पण तसा मिळाला. झाडउंदराचा दुर्मिळ फोटोसुद्धा मिळाला.
सारस पक्ष्यांचे आनंदी नृत्य, तांबट पक्षीण आपल्या पिलांना भरवताना किंवा सुतार पक्षी घरटं करत असतानाचा, गव्यांच्या टकरीचा असे दुर्मिळ आणि सुंदर, वैशिष्टय़पूर्ण व्हिडिओज ‘कुहू’साठी मिळाले. अनिल दामले, अनिल महाजन, अरविंद तेलकर या मंडळींनी शूट केलेले हे व्हिडिओज आहेत. ते बघणं ही नजरेला अक्षरश: ट्रीट आहे.
हे व्हिडीओ वापरताना डोळ्यांसमोर फक्त करमणूक हे उद्दिष्ट नक्कीच नव्हतं असं कविता सांगते. मनोरंजनातून ज्ञानरंजन हा एक हेतू ‘कुहू’च्या निर्मितीमध्ये सतत मनाशी बाळगला आहे. उदा. कोतवाल पक्षी हा जातीवंत नकलाकार. इतर पक्ष्यांचे हुबेहूब आवाज तो काढतोच, पण कोतवाल हा पक्ष्यांना धोक्यापासून सावध रहाण्याची सूचनाही आपल्या या कलेद्वारे देत असतो हे ज्ञान ज्या वेळी त्यावर आधारित व्हिडीओ समोर दिसतो तेव्हा फार पटकन मुलांपर्यंत पोहोचतं.
‘कुहू’मध्ये जंगलाला फार महत्त्वाचे, अगदी केंद्रस्थान आहे. अनिल दामलेंकडे घनगर्द हिरव्या रेनफॉरेस्ट्सचे अप्रतिम व्हिडिओज मिळाले. प्रचंड मोठय़ा, खोल दऱ्या, त्यात कोसळणारे धबधबे आणि त्यांच्यामधल्या तुषारांवर उमटलेली इंद्रधनुष्यं अशी त्या व्हिडीओमधून मिळालेली दृश्य नजरेचं पारणं फिटवतात. आफ्रिकेच्या वर्षांरण्यातल्या रोप-वेवरून त्यांनी हे व्हिडीओ शूट केले होते आणि विशेष म्हणजे ते अतिशय स्मूद आहेत. त्यात कुठेही जंगलातल्या झाडांच्या शेंडय़ांना स्पर्श करून जाणाऱ्या विजेच्या, केबलच्या तारा अशी रसभंग करणारी शहरी दृश्ये नाहीत.
‘कुहू’मधले पक्ष्यांचे आवाज हे नुसते आवाज म्हणून येत नाहीत. कथानकातील वेगवेगळ्या प्रसंगी पक्षी आपल्या त्या वेळच्या भावनांना अनुसरून लकेरी मारतात, गातात किंवा चित्कारतात. कधी वेदनेने किंचाळतातही. त्यासाठी पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज तर वापरले आहेतच, पण किरण पुरंदरेंच्या पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढण्याच्या कौशल्याचाही वापर करून घेतला गेला आहे. पिलांना भरवतानाचा पक्ष्यांचा चिवचिवाट वेगळा असतो आणि काही धोका जाणवला किंवा वेदना झाली तर किंवा पक्षी प्रणयाराधन करतात तेव्हा असा त्यांचा आवाज वेगवेगळ्या भावनांसहित वेगवेगळा उमटतो. पिलू होताना कावळीचा एरवी कर्कश असणारा आवाजही नाजूक झालेला असतो. आता या सूक्ष्म आवाजाच्या छटा पक्ष्यांच्या नैसर्गिक आवाजाच्या रेकॉर्डिगमधून मिळवणं कठीणच होतं. किरण पुरंदरे जवळपास १०० पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढू शकतात. त्यांनी अत्यंत सुरेलपणे ‘कुहू’मधले पक्ष्यांचे आवाज काढले.
‘कुहू’च्या शीर्षकाची कॅलिग्राफी फार देखणी आणि अर्थपूर्ण आहे. ‘कुहू’तला मूड, स्वभाव, कुहूची सारी कथाच जणू या शीर्षकातून डोळ्यापुढे उमटते. एक गाणारा पक्षी आणि त्याच्याकडे पाठ फिरवून बसलेली एक मुलगी, निळ्या हिरव्या, काळ्या रंगछटांचे मोहक मिश्रण केलेले कलर्स. ‘कुहू’च्या मल्टिमीडिया स्वरूपातून अपेक्षित असणाऱ्या दृश्यानुभवाची एक झलक ‘कुहू’च्या लोगोमधून मिळते. तो बनवला आहे ‘कुहू’च्या टेक्निकल टीमचे प्रमुख समीर सहस्रबुद्धे यांनी. कविताचा एकेकाळचा चित्रकला सहाध्यायी असलेल्या समीरचा अ‍ॅनिमेशन क्षेत्रातला अनुभव खूप मोठा आहे. आयआयटीमधली प्रोजेक्ट मॅनेजरची नोकरी, शिवाय पीएच.डी.चा अभ्यास सांभाळून तो ‘कुहू’च्या तांत्रिक बाबी सांभाळत आहे. त्याची अ‍ॅॅनिमेटर पत्नी कौमुदीसुद्धा ‘कुहू’च्या टीममध्ये आहे. त्यांच्यासोबत स्नेहा देवरुखकर, आशय सहस्रबुद्धे, व्हिडिओ एडिटिंगसाठी प्रकाश जडियार, संदीप गायकवाड, कॅलिग्राफीसाठी राज दुसाने, सुभाष गोंधळे अशी भक्कम टीम ‘कुहू’ची तांत्रिक बाजू सांभाळत आहे.
‘कुहू’ कादंबरीचं मल्टिमीडिया स्वरूप म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न या टेक्नॉलॉजीशी फारसा संबंध न येणाऱ्या वाचकांना निश्चितच पडणार याची समीरला जाणीव आहे. लोक विचारत असतात की, हे नक्की काय असणार आहे? ही अ‍ॅनिमेशन फिल्म आहे का किंवा कादंबरीवर आधारित चलचित्रपट आहे का? तर याचे उत्तर हो. हा चलचित्रपट तर आहेच, पण त्यात अजूनही काही वेगळं, काही अधिक आहे, असं समीर सांगतो. ‘कुहू’ ही एक सुंदर दृश्यानुभव देणारी कादंबरी आहे हे वाचकांनी लक्षात घेणं त्याला महत्त्वाचं वाटतं. त्याचं मल्टिमीडिया असणं किंवा इतर तांत्रिक बाबी या दुय्यम महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ कादंबरीत एक प्रसंग आहे की कुहूला पुन्हा उडता येऊ लागलं.. आणि त्याने आकाशात मस्त भरारी घेतली, तो हवेत गिरक्या घेऊ लागला. आता यात पाश्र्वभूमीवर धीरेश जोशी आणि तरंग पणशीकरचा आवाज हे सगळं वर्णन करून सांगत असतो, सुंदर पाश्र्वसंगीत वाजत असतं आणि कुहूच्या त्या देखण्या भराऱ्या दिसत असतात. तर हा दृश्यानुभव वाचकाला, प्रेक्षकाला जेव्हा गुंगवून टाकायला लागतो तेव्हा हे कसं बनवलं वगैरे तांत्रिक बाबी त्याच्या दृष्टीने दुय्यमच असणार. पडद्यावर दिसणाऱ्या या दृश्यात सहा-सात वेगवेगळे फोटोग्राफ्स आम्ही वापरले आहेत, तेही कसे तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या लोकेशनवर, वेगवेगळ्या वेळी काढलेले फोटो. ते कुठेही एकमेकांपासून वेगळे वाटू नयेत, माध्यमांचे मिश्रण करताना त्यात स्मूदनेस राखला जावा, फोटोची फ्रेमसाइझ, पिक्सेलिंग, शार्पनेस, आकार वगैरे बाबतीत काळजी घेणं हे इतकंच एक तंत्रज्ञ म्हणून माझं काम, बाकी प्रॉमिनन्स आहे तो अर्थातच कादंबरीतल्या कथानकाला आणि शब्दांना. ‘कुहू’चं कथानक पुढे जात असताना त्या-त्या टप्प्यावर आवश्यक ते माध्यम आम्ही निवडत गेलो. वेगवेगळी माध्यमं एकत्र आल्यावर एखादं माध्यम जास्त स्ट्राँग अथवा डोईजड व्हायची शक्यता असते. उदा. गाणी जास्त चांगली होणे किंवा पेंटिंग्जच नजरेत भरणे. तसं होऊ नये म्हणून माध्यमांचं एकत्रीकरण फार कौशल्याने करावं लागलं. तंत्रज्ञानाची कसोटीच इथे लागली. कथानकाच्या गरजेनुसार सगळ्या गोष्टी जमवणं, व्हिडीओज मिळवणं, पक्ष्यांचे आवाज अचूक, त्यातल्या भावनांसहित मिळवणं मग हे सारं तज्ज्ञांना दाखवून त्यांच्या सल्ल्यांनुसार पुन्हा बदल करणं हे सतत होत राहिलं. पन: पुन्हा बदल होत राहिले. वेगवेगळ्या अंगांनी कादंबरीचं वाचन होत राहिलं. कठोरपणे एडिटिंगला सामोरे गेलो.
समीरच्या मते तांत्रिकदृष्टय़ा ‘कुहू’ची स्ट्रेन्ग्थ आणि आव्हानं त्याच्या मिश्र माध्यमात आहे. अ‍ॅनिमेशन, ऑडिओ, व्हिडिओ, फोटोग्राफ्स, कॅलिग्राफी, चित्रं अशी वेगवेगळी माध्यमं यात कथानकाला अनुसरून येतात. माध्यमांचं बंधन नसल्याने काम करायला सोपं गेलं असं मात्र अजिबातच झालं नाही. सुरुवातीला कविताकडून ‘कुहू’चं कथानक आणि तिच्या डोक्यातली कल्पना ऐकली तेव्हा एक अ‍ॅनिमेटर, फिल्ममेकरच्या भूमिकेतून मला त्यात एका जागतिक दर्जाच्या अ‍ॅनिमेशन फिल्मचं प्रचंड पोटेन्शियल दिसलं. हा टोटली इंडिजिनस विषय होता. आत्तापर्यंत आपल्याकडे ज्या अ‍ॅनिमेशन फिल्म्स बनल्या आहेत त्या बहुतेक सगळ्या मायथॉलॉजिकल फिल्म्स आहेत. आधुनिक जगाशी नातं जोडणारी ‘कुहू’चं कथानक वापरून केलेली अ‍ॅनिमेशन फिल्म डिस्नेच्या कोणत्याही नव्या प्रोजेक्टच्या तोडीस तोड बनू शकली असती. पण त्यासाठी निदान १०० प्रशिक्षित अ‍ॅनिमेटर्सची टीम, सुसज्ज स्टुडिओ सेट अप, दोनशे कोटींचं बजेट आणि कमीत-कमी तीन-चार वर्षांचा अवधी इतक्या गोष्टी आवश्यक होत्या. हे सगळं कुठून आणणार? त्यामुळे तो विचार बाजूला ठेवून मी कविताच्या डोक्यातली कल्पना नीट ऐकली. मला ती प्रत्यक्षात उतरू शकेल असा विश्वास वाटला. तिला तसं सांगितलं. मग ‘कुहू’चा लोगो डिझाइन केला. मात्र यापुढे जाऊन जेव्हा प्रत्यक्ष कामाला, जमवाजमवीला सुरुवात झाली तेव्हा हे काम किती गुंतागुंतीचे आहे हे लक्षात येत गेलं. संपूर्ण अ‍ॅनिमेशन फिल्मला पर्याय म्हणून आवश्यकतेनुसार कधी पेंटिंग्ज, कधी कॅलिग्राफी, फोटो, व्हिडीओज वगैरेचा वापर सुरू झाला, वेगवेगळी माध्यमं एकत्र येत गेली खरी, पण मग त्या माध्यमांचं एकत्रीकरण पडद्यावर एकसंधपणे दिसणं आवश्यक होतं. विविध माध्यमांच्या मिश्रणातून कथानक पुढे नेत राहणं ही क्रिएटिव्हिटिला मुक्त वाव देणारी गोष्ट असली तरी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे काम नक्कीच आव्हानात्मक.
एका टप्प्यावर तर आपण पुढेच जाऊ शकत नाही असंही वाटलं, कारण ‘कुहू’मध्ये वास्तव आणि कल्पना, सत्य आणि फॅन्टसी यांची सतत सरमिसळ होत असते, पण मग एक अ‍ॅनिमेटर म्हणून मी माझा अनुभव आणि कौशल्य पणाला लावून या वास्तव आणि अद्भुताच्या जगातला समतोल पडद्यावर कसा दाखवता येईल याचं आव्हान स्वीकारायचंच असं ठरवलं. हे ठरवणं आणि ते कसं करायचं हे निश्चित करण्याची प्रोसेस हा कुहूच्या निर्मितीतला सर्वात कठीण आणि आव्हानात्मक भाग. त्यानंतरच एक्झिक्युशन एक तंत्रज्ञ म्हणून माझ्या दृष्टीने एकदम सोपं होतं. उदा. सृष्टिदेवता पक्ष्यांची निर्मिती करते. पहिला पक्षी बनवते हा प्रसंग पडद्यावर नेमका कसा येणार हे व्हिज्युअलाइझ करणं मला खूप कठीण गेलं. मग मी चक्क माझ्या मुलीच्या हातात माती दिली आणि तिला पक्षी बनवायला सांगितला. ती त्या मातीशी खेळत असताना तिच्या हातांचं व्हिडीओ शूटिंग केलं आणि मग त्या हातांच्या दृश्यांना ट्रीटमेन्ट दिल्यावर ते सृष्टिदेवतेचे हिरवे हात झाले. कविताने लिहिलेले असते की मग पक्ष्याला तीक्ष्ण नजर आली, त्याचे पंख बनले वगैरे तेव्हा तो तीक्ष्णपणा अधोरेखित करताना काही इफेक्ट्स दिले. लक्षात घ्या, अ‍ॅनिमेशनमध्ये आधी चित्रं महत्त्वाची असतात आणि मग आवश्यक तेवढेच संवाद त्यामागून येतात. इथे शब्द कविताने आधी लिहून ठेवलेले होते. पुस्तकात ते राहाणारही होते. त्याला अनुसरून दृश्यानुभव हा तांत्रिक भाग फक्त मी करत गेलो आहे.
अ‍ॅनिमेटर म्हणून स्पेशल इफेक्ट्स जास्तीत जास्त वापरण्याचा मोह मला होणं साहजिकच होतं, पण मी त्याबाबतीत स्वत:ला खूप कंट्रोल केलं, त्याचं कारण पुन्हा तेच. माध्यमांचा समतोल राखणं गरजेचं होतं. कोणतंही एक माध्यम इतर माध्यमांपेक्षा वरचढ झालं तर या मिश्रमाध्यम दृश्यानुभवातला एकसंधपणा राहिला नसता. जे स्पेशल इफेक्ट्स वापरले तेही अगदी अत्यावश्यक असेच. म्हणजे कविताने लिहिलेल्या वर्णनानुसार कुहूच्या पिसाऱ्यात एक निळं पीस आहे. ते जादूचं आहे. काही प्रसंगात त्यातून छोटय़ा-छोटय़ा सोनेरी ठिणग्या बाहेर पडतात, असं सुंदर वर्णन आहे. तर तेवढय़ासाठी स्पेशल इफेक्ट अत्यावश्यक. काही पोर्शनमध्ये मोशन, वेग होता तेव्हा अ‍ॅनिमेशन तंत्र वापरलं. ‘कुहू’मधल्या गाण्यांच्या सुरावटीला कॅलिग्राफीमधले शब्द खूप छान सपोर्ट करतात असं लक्षात येत गेलं. तेव्हा तिथे ते वापरले.
आणखी एक गोष्ट समीरला आवर्जून सांगावीशी वाटते- कादंबरीवरची एखादी फिल्म असते म्हणजे उदाहरणार्थ, ‘देवदास’. तर त्यात देवदासची भूमिका शाहरुख खान करतो आणि अख्ख्या फिल्ममध्ये देवदास म्हणून तोच असतो. ‘कुहू’मध्ये कोणी एकच कोकीळ किंवा इतर पक्षी-प्राणी हे कोणती भूमिका करत नाहीत. तसं करणं आम्हाला शक्यच नव्हतं. ‘कुहू’ अ‍ॅनिमेटेड असता तर हा प्रश्नच आला नसता. इथे ‘कुहू’ कधी फोटोग्राफ्समधून दिसतो, कधी पेंटिंगमधून, कधी व्हिडीओमधून पडद्यावर जिवंत पक्षी दिसतो. हे फोटो किंवा व्हिडीओ वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या वेळी नैसर्गिकपणे चित्रित केलेले असे. माणसांना वेगवेगळा चेहरा असतो तसा पक्ष्यांना नाही, तेव्हा हे खटकणारं नाही पण काहींच्या मनात कदाचित अशी समजूत असू शकते की काही ‘कुहू’मध्ये आम्ही कोणता एकच कोकीळ घेतला आहे तर त्यासाठी हे स्पष्टीकरण.
‘कुहू’मध्ये एकूण सत्तर लहानमोठय़ा व्यक्तिरेखा आहेत. कादंबरीचं वाचन करत असताना त्या व्यक्तिरेखांना त्यांच्या स्वभावछटांनुसार आवाज देणे, तेही शब्दांचा नाद आणि लय जपत हे काम फार आव्हानात्मक होतं. धीरेश जोशी यांनी मोठय़ांच्या मराठी आवृत्तीचं वाचन केलं आहे तर रिमा लागू यांनी बाल आवृत्तीला आपला आवाज दिला आहे. इंग्रजीमध्ये मोठय़ांच्या आवृत्तीसाठी तरंग पणशीकर आणि बाल-आवृत्तीसाठी नेष्मा चेंबूरकरांचा आवाज आहे.
लहान मुलांना नजरेसमोर ठेवून ‘कुहू’साठी आवाज देण्याचा अनुभव रिमा लागूंच्या दृष्टीने प्रचंड आनंददायी ठरला. ‘कुहू’च्या एकंदर अनुभवाबद्दल रिमा लागू सांगतात- ‘‘शूटिंगच्या तारखा आधीच लागलेल्या असल्याने वेळेची कमतरता होती, त्यामुळे ‘कुहू’चं रेकॉर्डिग आम्ही सकाळी दहापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकाच दिवसात सलग केलं, पण एकदाही कधी बास आता, थकायला झालंय असं वाटलं नाही. याचं कारण कादंबरीचं अत्यंत ताजं कथानक. कविता महाजनांनी जेव्हा ‘कुहू’ वाचून दाखवली तेव्हाच मी त्यातल्या सशक्त, सुंदर आणि अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथावस्तूमुळे भारावून गेले होते. लहान मुलांसाठीची ही काही फक्त एक परीकथा किंवा मिथक कथा नाही तर यात एक सुंदर तत्त्वज्ञान आहे. कुहूचा जंगलातून माणसांच्या दुनियेत झालेला प्रवास आणि मग त्याचे पुन्हा पक्ष्यांच्या जगात परत येणे हा जो एक प्रवास आहे तो एक माणूस म्हणून आपल्याला खूप अंतर्मुख करून सोडतो. हे हवं, ते हवं करत भौतिक सुखांच्या मागे धावत असताना आपण किती लहान-लहान आनंदांना, सुखांना पारखे होत गेलो आहोत आणि त्याची किंमतही आपण किती चुकवत आहोत याचं एक मोठं भान पुन्हा एकदा ‘कुहू’च्या कथानकातून होत गेलं. मी मानसिकरित्या कथानकशी खूप जोडली गेले. ‘ब्र’, ‘भिन्न’ किंवा ‘ग्राफिटी वॉल’मधून मला भेटलेली कविता महाजन ही आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून विचार व्यक्त करणारी लेखिका म्हणून मला माहीत होती. ‘कुहू’मध्येही हा निखळ प्रामाणिकपणा मला दिसला. मला स्वत:ला अ‍ॅनिमेशन फिल्म्स आणि त्या प्रकारचे सिनेमे खूप आवडतात. परदेशात अशा प्रकारच्या प्रयोगांसाठी मोठमोठे हॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री आपला आवाज देत असतात. आपल्याकडे अशा तऱ्हेचा प्रयोग इतक्या अभिजात पद्धतीने होत असताना त्यात मला कॉन्ट्रिब्युट करायला मिळालं याचा मला खूपच आनंद वाटतो.
‘कुहू’साठी एक सुंदर बंदीश यात मी गायले आहे. यामध्ये शास्त्रोक्त रागदारीवर आधारित २१ गाणी आहेत. सुस्वर आलापी, बासरी, गाणी यामुळे ‘कुहू’ला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे.
कुहू हा गाणारा पक्षी. प्रत्यक्ष कोकीळ. तेव्हा कुहूच्या दृश्यानुभवात संगीतही तितकेच महत्त्वाचे. प्रोमो बघत असताना कुहूच्या मुखातून बाहेर पडणारी सुंदर आलापी आणि रागदारीवर आधारित गाण्यांचे, पाश्र्वभूमीवर उमटणारे बोल मोहवून टाकतात. ‘कुहू’ला संगीत दिलं आहे सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर आणि चैतन्य कुंटे यांनी. आरती अंकलीकरांचा संगीत देण्याचा हा पहिलाच अनुभव. आरती अंकलीकरांनी स्वत:ही एक सुंदर बंदीश ‘कुहू’साठी गायली आहे. ‘कुहू’मध्ये एकूण २१ शास्त्रोक्त रागदारीवर आधारीत गाणी आहेत आणि ती गायली आहे. हृषिकेश बडवे, मधुरा अत्रे आणि शरयू दाते या गुणी गायक कलाकारांनी. शरयू आणि मधुरा यांची लहान वयातली गाण्याची पक्की जाण आणि तयारी तर थक्क करून टाकणारी आहे. आपल्याकडे साधारण लहान मुलांना गाणी देताना ती वेस्टर्न सुरावटीवर बेतलेली देण्याचाच प्रघात असतो पण ‘कुहू’मध्ये रागदारीवर आधारित सगळी गाणी आहेत हे खूप छान वाटते. आमोद कुलकर्णींचा तबला आणि अमर ओकांची सुरेल बासरी, रागदारीवर आधारित गाणी, सुस्वर आलापी आणि स्वत: आरतीताईंनी गायलेली बंदीश यामुळे ‘कुहू’ला एक अप्रतिम अभिजात स्तर मिळतो.
‘कुहू’ वाचून दाखवली तेव्हाच मी त्यातल्या सशक्त, सुंदर आणि अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथावस्तूमुळे भारावून गेले होते. लहान मुलांसाठीची ही काही फक्त एक परीकथा किंवा मिथक कथा नाही तर यात एक सुंदर तत्त्वज्ञान आहे.
जिवावरचे एक दुखणे आणि पाठ मोडून टाकणारा एक अपघात यांच्यावर मात करत एक मराठी लेखिका आपल्या सर्व ताकदीला एकवटून पुन्हा उठून उभी राहाते. आणि नुसती उभी राहात नाही तर आजवर संपूर्ण साहित्यक्षेत्रात कुणाच्या कल्पनेतही आला नाही असा एक प्रोजेक्ट हातात घेते. हा प्रोजेक्टही कसा तर पूर्ततेसाठी तिला आत्तापर्यंत फारशा ज्ञात नसलेल्या तंत्रज्ञानाची गरज असणारा, महत्त्वाकांक्षी, कल्पनेची-सर्जकतेची कसोटी पाहाणारा आणि अर्थातच प्रचंड खर्चीक. या प्रोजेक्टशी संबंधित असणारे तज्ज्ञ सांगतात की आंतरराष्ट्रीय पातळीवर असा प्रोजेक्ट कमीत कमी दोनशे कोटी फंडिंग, १०० प्रशिक्षित तंत्रज्ञांची टीम आणि तीन ते चार वर्षांच्या अवधीशिवाय पूर्ण होणेच शक्य नाही. पण आपली ही मराठी लेखिका हा प्रोजेक्ट सर्वस्वी एकटीच्या प्रयत्नांवर भरवसा ठेवून, झपाटल्यासारखे रात्रंदिवस काम करून, जोडलेल्या स्नेहसोबत्यांच्या मदतीने, त्यांच्यातल्या कलाकौशल्यावर पूर्ण विश्वासाने विसंबून केवळ दोनक वर्षांमध्ये.. मराठीतली नव्हे साऱ्या भारतीय भाषांमधली पहिली मल्टिमीडिया नॉव्हेल लिहिण्याचा आपला प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेते.
कल्पनेपेक्षाही अद्भुत असा हा कविता महाजनांच्या ‘कुहू’चा प्रवास पाहून मला पुन्हा पुन्हा अद्भुतरम्य कल्पना वास्तवात आणणारा पडद्यावरच्या निखळ मनोरंजनाचा बादशहा वॉल्ट डिस्ने आठवत राहीला.. "All Our Dreams Can Come True, If We Have The Courage To Pursue Them" म्हणणारा वॉल्ट डिस्ने.

शर्मिला फडके
‘कुहू’ या मल्टिमीडिया नॉव्हेलच्या निर्मितीमागची सगळी कथा प्रत्यक्ष लेखिकेकडून जाणून घेणं महत्त्वाचं होतं. मग कविताबरोबर एक प्रदीर्घ गप्पासत्र पार पडलं.
‘कुहू’ कादंबरीमध्ये शब्दांव्यतिरिक्त इतकी सगळी माध्यमे नक्की का वापराविशी वाटली? तुझ्यामधला चित्रकार कादंबरीलेखनामध्ये तैलचित्रांचा वापर करू इच्छितो हे समजण्यासारखं आहेही, पण अ‍ॅनिमेशन, संगीत, व्हिडीओज, कॅलिग्राफी.? शब्दमाध्यमांना या बाकी दृश्यमाध्यमांची इतकी जोड का? ‘कुहू’चं मल्टिमीडिया स्वरूप नक्की कधी निश्चित झालं? कथानकातल्या माध्यमांची जागा कशी ठरवली?
हे मुद्दाम नाही झालं. ‘कुहू’चं कथानक जन्माला आलं तेच या साऱ्या माध्यमांना आपल्यात सामावून घेत. कुहू हा गाणारा पक्षी, जंगलात राहाणारा. आपल्या गाण्याने त्याला सारं जग सुंदर बनवायचं आहे. एकदा त्या जंगलात मानवाच्या वसाहतीतून पर्यावरणाचा अभ्यास करायला काही मुलं आणि मुली येतात. त्यातल्या एका मुलीला कुहूचं गाणं खूप आवडतं आणि तिला कुहू आवडायला लागतो. कुहूसुद्धा तिच्या प्रेमात पडतो आणि मग प्रेमात पडल्यावर जे काही करावंसं वाटतं ते सारं तो करायला जातो. माणसाची भाषा त्याला माणसाची भाषा त्याला शिकायची आहे, माणसांचा स्वभाव जाणून घ्यायचाय. मानुषीच्या प्रेमात पडलेल्या कुहूमुळे पक्ष्यांची आणि माणसांची भिन्न जग डहुळून जातात.
कुहूची व्यक्तिरेखा, तो राहात असतो ते जंगल, जंगलातले इतर प्राणी, पक्षी यांचं जग, त्यातले बारीकसारीक तपशील जे माझ्या मनात ठळकपणे उमटले होते ते त्यातल्या रंग, आकार, आवाजांच्या संवेदनांसहित होते आणि ते नेमकेपणी व्यक्त करायला शब्दांचं माध्यम पुरेसं नाही असं माझ्या लक्षात येत गेलं. मग शब्दांना रंग, सूर वगैरे माध्यमांची जोड देऊन त्यांच्या संवेदनांची जाणीव तीव्र करता येऊ शकेल का, याचं विचारचक्र माझ्या मनात सुरू झालं. पण या बाबतीत नेमकं काय करता येऊ शकेल ते कळत नव्हतं. त्यावेळी एकदा अचानक माझा जुना मित्र समीर सहस्रबुद्धे भेटला. तो अ‍ॅनिमेशन फिल्डमधला. त्याची काही अ‍ॅनिमेशन्स बघताना जाणवलं की ‘कुहू’ची कथा आपण तंत्रज्ञानाची मदत घेऊन डीव्हीडीमध्ये बसवू शकतो. मग त्याचं मल्टिमीडिया स्वरूप पुढे समीरशी होणाऱ्या चर्चेमधून हळूहळू स्पष्ट होत गेलं.
आता मला काय नक्की हवंय ते स्वत:शी मोकळेपणी ठरवता यायला लागलं. माध्यमांशी तडजोड थांबवली. जे मनात आहे ते कधी रंगांतून, कधी शब्दांतून असं व्यक्त होतं राहिलं. लिहिलेलं आपल्या जाणिवांशी जुळतंय की नाही ते पुन: पुन्हा तपासून पाहात राहिले. तब्बल १९ वेळा मी ‘कुहू’चा ड्राफ्ट लिहून काढला.
कुहूचा माणसांच्या जगाकडे आणि पुन्हा परत असा सगळा प्रवासच मुळात गाण्यांच्या सोबतीने होतो. त्याच्या मनात उमटणाऱ्या भावनांना जे स्वर होते त्यांची गाणी झाली. काही स्वर, शब्द त्याचे स्वत:चे आकार, रंग घेऊनच जन्मतात. त्यांना कॅलिग्राफीशिवाय पर्याय नव्हता. उदा. पक्ष्याचे पिल्लू जेव्हा कळवळून आई. म्हणून ओरडते तेव्हा त्याच्या त्या आवाजाला पडद्यावर कॅलिग्राफीमधून साकारावेसे वाटले. मग हळूहळू एकेक माध्यम ‘कुहू’मध्ये आपापली जागा घेऊ लागलं. ऑडिओ, व्हिडीओ, कॅलिग्राफी, पेंटिंग्ज, फोटोग्राफ्स, अ‍ॅनिमेशन इत्यादी. एकूण साडेतीन तासांची ही डीव्हीडी बनली. माध्यमांचं हे एकात एक गुंतणं आहे. अनेक माध्यमं एकत्रित येऊन त्यांचं वेगळं असं माध्यमच विकसित झालं आहे या प्रयोगात. प्रत्येक माध्यमाची आपापली एक वेगळी मजा आहे.
‘कुहू’ नेमकी कधी आणि कशी सुचली? ‘कुहू’च्या कथानकात जंगल आणि माणूस यांच्यामधलं नातं हा केंद्र विषय आहे. तुझी या आधीची पुस्तके म्हणजे ‘ब्र’, ‘भिन्न’ या कादंबऱ्या, ‘तत्पुरुष’ किंवा ‘धुळीचा आवाज’ हे कवितासंग्रह, नुकतंच आलेलं ‘ग्राफिटी वॉल’सारखं पुस्तक, या सर्वापेक्षा ‘कुहू’चं स्वरूप फारच वेगळं आहे. लेखनवृत्तीत झालेला हा बदल जाणीवपूर्वक आहे की नकळत?
‘भिन्न’ लिहून झाल्यावर प्रचंड ताण मनावर होता, कारण जशी ‘ब्र’ एका क्षणाला लिहून संपली तशी ‘भिन्न’ लिहून संपलीच नाही कधी. त्यात खूप अडकून राहिले होते मानसिकरित्या, कार्यकर्त्यांच्या भूमिकेतूनही. एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून जन्माला आलेली मुले, त्यांना जन्म देऊन तरुण वयात मृत्युमुखी पडलेल्या मुली, त्यांच्या यातना हे सगळं जग, छळ, फसवणूक, नात्यांवरचा, माणसांवरचा विश्वास उडवणारं होतं. त्यानंतर टाटा समाजविज्ञान संस्थेसाठी विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांची सद्यस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी एक अभ्यासदौरा केला. जवळ जवळ ७/८ महिने विदर्भातच होते. तेव्हाही पुन्हा मृत्यू, ताण, आत्महत्या झालेल्या त्या घरातल्या लहान वयाच्या मुलांच्या मनावर झालेला विपरित परिणाम. त्या काळात मी एका कुरूप वास्तवाच्या सातत्याने सहवासात होते. जगात काही तरी सुंदर आहे, चांगलं आहे याचा विश्वास पुन्हा मिळवणं मला गरजेचं झालं. पण आजूबाजूच्या जगातून तो मला मिळेना. निरागसता, साध्या साध्या गोष्टींमधून होणारा आनंद, निर्भेळ छोटी-छोटी सुखं कुठे तरी नाहीशीच होत चाललेली आहेत, दुर्मिळ झालेली आहेत असं त्या काळात अचानक लक्षात यायला लागलं. समाजाचा, त्यातल्या व्यक्तींचा एकंदर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच समूळ बदलत चालला आहे हे स्पष्ट दिसत होतं. नैसर्गिक वागणं माणसांना आजकाल अनैसर्गिक वाटायला लागलंय की काय अशी परिस्थिती आजूबाजूला असते हेच हवं होतं का आपल्याला? कुठे घेऊन जाणार आहे हे सारं? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा मग प्रयत्न सुरू झाला. शोध सुरू झाला त्या निरागस आनंदाचा. एक व्यक्ती म्हणून आणि एक लेखक म्हणूनही हा शोध सुरू होता, पण काही केल्या मनात सकारात्मक असं काही बीज रुजेना. अस्वस्थता, ताण वाढतच होता.
आणि एक दिवस अचानक मला ही एका पक्ष्याची रूपक कथा सुचली. जंगलात राहणाऱ्या एका गाणाऱ्या पक्ष्याची गोष्ट. ती लिहून काढली. पण आज काल कोणीच रूपक कथा लिहीत नाही. तेव्हा ती कितपत फुलवावी, असा प्रश्न मनात आला आणि ती तशीच दोन र्वष पडून राहिली. सुधीर रसाळांशी एकदा सहज त्याबद्दल बोलणं झालं. सुचलेली कथा कोणत्या फॉर्ममध्ये सुचली आहे, तो योग्य आहे का अशा विचारांच्या फार आहारी जाऊ नकोस, सुचले आहे ते लिहून काढ, उत्स्फूर्तता महत्त्वाची, असा सल्ला त्यांनी दिला. तेव्हा मनावरचं दडपण, ताण कमी झाला. लिहिताना आपोआप मोकळेपणा येत गेला.
त्या काळातच तुझं पेंटिंगही एका मोठय़ा गॅपनंतर सुरू झालं होतं, ते कसं काय? ‘कुहू’साठी पेंटिंग्ज करायची हा उद्देश त्यामागे होता का? ‘कुहू’च्या कथानकाचं आणि चित्रांचं नक्की काय नातं आहे?
मधल्या काळात पेंटिंग करणं मी अजिबातच सोडून दिलं होतं. वैचारिक, भाविनक गोंधळाचाच तो काळ होता. ‘कुहू’चा विषय योग्य आहे की नाही, यावर पुढे लिहिता येईल की नाही ते कळत नव्हतं. लेखन बंदच झालं. विचित्र बेचैनी मनात सतत होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी मग मी ठरवून चित्रांकडे वळले. मधे १८ वर्षांची गॅप झाली होती. फारसा आत्मविश्वास नव्हता, पण ऑइलचं सामान आणलं आणि सगळं सोपं झालं. मधली र्वष जणू गेलीच नव्हती इतक्या सहजतेनं काम सुरू झालं. ‘कुहू’चा विषय डोक्यात होता. मग त्या विषयावरचं पेंटिंग्ज सुरू झाली. या आधी पेंटिंग करताना मी जे रंग कधीच वापरले नसते ते सगळे रंग, वेगवेगळी तंत्रं बेधडक वापरायला लागले. ऑइल पेंटिंग हे खरं तर खूप वेळ घेणारं माध्यम आहे, पण माझ्या डोक्यात चित्र इतकं सुस्पष्ट उमटत असे की, आश्चर्य वाटेल इतक्या कमी वेळात चित्र पूर्ण होत गेली. रफ स्केचिंग वगैरे भानगडीच नाही. डायरेक्ट कॅन्व्हासवर रंगांची मुक्त उधळण.
‘कुहू’साठी पेंटिंग्ज करतानाचा माझा अनुभव विलक्षण होता. रंगांच्या माध्यमांतून व्यक्त होणं म्हणजे नेमकं काय याचा अनुभव मला आला. त्या काळातल्या माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात मी बाजूला सारून ठेवलेल्या, दडपलेल्या, कोंडलेल्या साऱ्या भावनांचा निचरा कॅन्व्हासवर माझ्या हातून उमटणाऱ्या रंगाच्या प्रत्येक फटकाऱ्यातून होत गेला आणि तो मला जाणवत गेला. मी अधिकाधिक मुक्त होत गेले. हा सारा काळ जेव्हा मी चित्र रंगवण्यासाठी इझलसमोर उभी राहात होते तो माझ्यासाठी फार आनंदाचा होता. माझी तब्येत खरं तर बरी नसायची. कधी जेमतेम १५ मिनिटं मला उभं राहून रंगवता यायचं, पण हळूहळू हा वेळ वाढत गेला. अर्धा तास, दोन तास. माझ्या मनात बरीच र्वष एक खंत होती की माझं पेंटिंग सुटलं. ती खंत निवळत गेल्याचा आनंद इतका होता की त्यापुढे शारीरिक कष्ट, वेदना मला जाणवल्याही नाहीत. मनातल्या भावनांचा निचरा होत असल्याने सुरुवातीला पेंटिंग करून झाल्यावर मला आत्यंतिक थकवा यायचा. ‘कुहू’च्या भावभावनांसोबत नकळत माझ्याही भावना पेंटिंग्जमधून आविष्कृत होत गेल्या. आता जेव्हा तटस्थपणे ही पेंटिंग्ज मी पाहाते तेव्हा मला हे जाणवतंय. त्या वेळी अर्थातच कॅन्व्हासवर रंगलेपनाचा फक्त एक आवेग मनात होता. आपण एरवी जसे रडून मोकळे होतो तशी मी चित्रांवरच्या रंगांमधून मोकळी होत गेले.
‘कुहू’ कादंबरीतला कोकीळ मानुषीवर प्रेम करत असतो. सृष्टीकडे तो हट्टच धरतो की मला तू माणूस बनव. सृष्टी ऐकते. शेवटी त्याचं आणि मग कुहूचं म्हणजे त्या कोकीळ पक्ष्याचं रूपांतर माणसात व्हायला लागतं. त्या वेळी त्या बदलाची वेदना कुहूला अंतर्बाह्य जाणवते. या प्रसंगावर मी जेव्हा पेंटिंग करत होते तेव्हा कुहूचा तो आक्रोश माझ्या बोटांना जाणवत होता. कोकीळ पक्ष्याची पांढरट लाल रंगाची अर्धवट उघडी चोच, त्याच्या डोळ्यातली वेदना चित्रात जशीच्या तशी उमटली.
‘कुहू’तलं माझं सर्वात आवडतं पेंटिंग आहे प्रेमात पडल्यावर उन्मुक्तपणे नाचणाऱ्या बगळ्याचं. अत्यंत आनंदी, उत्फुल्ल मूड पकडता आला आहे मला या चित्रात असं वाटतं. प्रेमात पडल्यावर आजूबाजूची दुनियाही बदलून जाते. बगळा मान उंचावून चंद्राकडे बघत जेव्हा नृत्य करायला लागतो तेव्हा त्याला तो चंद्रही फक्त आपल्याकरिताच प्रकाश पाझरवत आहे असं वाटत असतं. चित्रातला चंद्रही त्यामुळे एखाद्या फ्लडलाईटसारखा तेजाळला आहे. बगळ्याच्या पायातळीचा पाचोळाही आनंदाने उडत आहे. आता सांगतानाही आश्चर्य वाटतंय की, हे प्रेमात पडलेल्या बगळ्याचं चित्र मी अक्षरश: पंचवीस मिनिटांमध्ये चितारलं.
‘कुहू’साठी पेंटिंग करण्याच्या या प्रोसेसमध्ये मनावरचा सारा ताण निवळला. लेखन आपसूक सुरू झालं. शब्दांसोबतच चित्रही मनात येत गेल्याने ‘कुहू’ लिहीत असताना शब्दांचा अतिरेकी वापर आपोआप टाळला गेला.
‘कुहू’साठी केलेली ही सर्व म्हणजे एकूण ४३ पेंटिंग्ज डीव्हीडीमध्ये असणार आहेत तशीच कादंबरीतही असणार आहेत का? या इतक्या ऑइल पेंटिंग्जना पुस्तकात सामावून कसे घेतले आहे?
‘कुहू’मधली पेंटिंग ही एक स्वतंत्र चित्रं म्हणूनच आहेत. ती काही कथानकाला अनुसरून केलेली इलस्ट्रेशन्स किंवा पूरक चित्रं नाहीत. सर्व पेंटिंग्ज पुस्तकात कथानकाचा भाग म्हणूनच येतील. कुहूच्या निमित्ताने ज्या बऱ्याच गोष्टी मराठीत (आणि इतर भारतीय भाषांमध्येही) पहिल्यांदाच होणार आहेत त्यापैकी एक म्हणजे ही पूर्ण कादंबरी आर्ट पेपरवर छापली जाणार आहे आणि ती पूर्ण रंगीत असेल. त्यात तैलचित्रांचा वापर केला जाणार आहे.
‘कुहू’च्या चारही पुस्तकांच्या एकूण (बाल आवृत्ती धरून) ६१६ रंगीत पानांची मांडणी मी स्वत: केली आहे. पहिल्यांदाच हे केलं आणि तेसुद्धा केवळ १५ दिवसांत. पुस्तकाचं मुखपृष्ठाचं चित्र चितारताना जितकी मेहनत घेतली जाते तितकी ‘कुहू’ पुस्तकाच्या प्रत्येक पानासाठी मी मेहनत घेतली आहे. ‘कुहू’चं प्रत्येक पान हे रंगीत आर्ट प्लेटच आहे. रंगांची, पोताची अद्भुत दुनिया ‘कुहू’च्या पानापानांतून उलगडत जाईल.
‘कुहू’मधलं जंगल कथानकात एक महत्त्वाची भूमिका बजावतं. यातले कुहूचे सोबती, वेगवेगळे प्राणी, पक्षी फार लोभस वाटतात, खरे वाटतात. जंगल आणि माणसामधले तुटत गेलेले नाते पुन्हा प्रस्थापित होण्याबद्दल भाष्य कुहूच्या कथानकात आहे. ते भाष्य नेमकं कसं येतं? पूर्वी इसापनीतीमधून जसा प्राणी-पक्ष्यांद्वारे शहाणपणाचे, नैतिकतेचे धडे अचूक पोचवले जायचे तसे यातले कुहूचे सोबती पर्यावरण संवर्धनाचे, निसर्गाकडे परतण्याचे काही धडे आधुनिक काळाला अनुसरून देतात का?
जंगलातील जीवसृष्टीच्या आधुनिक अभ्यासाचा धांडोळा घेताना सापडलेल्या वास्तव निरीक्षणांचा आधार इथे घेतलेला असून माणसांच्या स्वभावाचं आरोपण प्राण्या-पक्ष्यांवर करणं टाळलं आहे. उदा. कोल्हा लबाड असतो वगैरे. आज आपल्याला नॅशनल जिओग्राफिक्स वगैरेमधून प्राणी-पक्षी फार जवळून त्यांच्या नैसर्गिक स्वभाव- कौशल्यांसहित जवळून न्याहाळता येतात, अनेकांनी प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या सवयींवर, स्वभाववैशिष्टय़ांवर संशोधन केलं आहे. त्यामधून जे शास्त्रीय निष्कर्ष काढले आहेत त्यानुसारच मी ‘कुहू’मधले प्रत्येक प्राणी-पक्षी रंगवले आहेत. त्या दृष्टीने ‘कुहू’ ही रिअ‍ॅलिटी बेस्ड फॅन्टसी आहे. कल्पनेहून अधिक अद्भुत असतं वास्तव हे ‘कुहू’मधून दाखवण्याचा प्रयत्न आहे. सशाच्या डोळ्यांना पापण्या नसतात किंवा झाडउंदराचं शरीर जेवढं लांब असतं तेवढीच लांब त्याची शेपटी असते. इथे वसईतही माझ्या घराभोवती खूप पक्षी जमतात. कोकीळ, ठिपकेवाली मुनिया, बुलबुल, सूर्यपक्षी, फुलचुखे, राघू, चिमण्या तर थव्यांनी असतात. त्यांच्या हालचाली मी निरखल्या, कुतूहलानं पक्ष्यांवरची अनेक पुस्तकं मुद्दाम मिळवून त्या काळात वाचली. कोतवाल पक्ष्याचं नकला करण्याचं कौशल्य, खारीचा को-ऑपरेटिव्ह स्वभाव अशा अनेक मजा ‘कुहू’त आहेत, ज्यांना शास्त्रीय आधार आहेत. यातल्या काही माझ्या कामाच्या निमित्ताने सतत जंगलातून फिरताना मला दिसलेल्या आहेत तर काही मी मुद्दाम वाचन करून जाणून घेतल्या. आपण म्हणतो सरडय़ाची धाव कुंपणापर्यंत. आता यामागेही वास्तव आहे. सरडा आपला परिसर सोडून उगीचच लांब कुठे भटकायला जात नाही. माझ्या घरासमोरच्या कढीपत्त्याच्या झाडावर एक सरडा रोज यायचा. त्याच फांदीवर, त्याच जागी बसायचा. एकदा त्याला मांजरीने पळवून लाावला. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथेच आला. मांजरीने दबा धरून हल्ला केला आणि त्याला मारून टाकला. ती विलक्षण झटापट मी पाहिली. ही अशी जीवननाटय़ं ‘कुहू’मध्ये उतरली. ही निरीक्षणं मी मुद्दाम केली नव्हती, पण त्यांचे संदर्भ ‘कुहू’मध्ये ठळकपणे उतरले.
‘कुहू’चं मल्टिमीडिया स्वरूप, पुस्तकाची आर्ट पेपरवर संपूर्ण रंगीत छपाई म्हणजे हे अत्यंत खर्चीक काम यात शंकाच नाही. ‘कुहू’ प्रोजेक्टची आर्थिक गणितं कशी जमवली?
‘कुहू’ सुचली आहे त्या स्वरूपात साकारायची ठरलं तेव्हाच आर्थिक बाजू हा कमकुवत दुवा ठरणार हे लक्षात आलं होतं, पण नेटाने सुरु वात केली. वैयक्तिक ओळखीमुळे, मैत्रीखातर अनेकांनी मला लहान मोठय़ा गोष्टींसाठी विनामूल्य सहकार्य केलं, अजूनही करत आहेत तरी स्टुडिओची भाडी, वादकांचं मानधन आणि इतर तांत्रिक खर्च प्रचंड आहेत. ‘कुहू’ ही मल्टिमीडिया कादंबरी माझ्या मनात जरी संपूर्णपणे साकारली होती तरी प्रकाशकांना प्रत्यक्ष दाखवायला हातात काहीच नव्हतं. तेव्हा त्यांना या कल्पनेत फार काही रस वाटेना. स्पॉन्सर्स मिळवण्यासाठीचे प्रयत्न ‘कुहू’च्या निर्मितीचा भार एकटीने सांभाळून माझ्याच्याने जमण्यासारखं नव्हतं आणि शिवाय त्यांना दाखवायलाही काही तरी मूर्त स्वरूपात तयार असायला हवं होतं नां? कल्पनेचं वारू मुक्त सोडलं होतं आणि नवनव्या कल्पना सुचतच जात होत्या. उदा. ‘कुहू’ पुस्तकाचं कव्हरं थ्री-डी करण्याची कल्पना. खर्च मारु तीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाऊन बजेट २०-२५ लाखांपर्यंत जाऊन पोहोचलं. मग मात्र गाडं पैशांवर येऊन ठप्प झालं. काय करायचं हा मोठ्ठाच प्रश्न होता. त्याच वेळी ‘वॉल्ट डिस्ने’वर यशवंत रांजणकर यांनी लिहिलेलं पुस्तक हाताशी आलं. ते वाचत गेले आणि कर्ज या गोष्टीकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. पुस्तकं एखादा निर्णय घ्यायलाही मदत करतात ती अशी. यातूनच मी सारस्वत बँंकेच्या एकनाथ ठाकूर यांना भेटले. त्यांनी याकडे संपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं. त्यांच्या सल्ल्यावरून मी ‘कुहू’च्या संकल्पित योजनेचा एक प्रोजेक्ट बनवून तो सारस्वत बँकेकडे सुपूर्द केला आणि बँंकेने चक्क शून्य व्याजदराने पाच वर्षांसाठी कर्ज द्यायचं मला मान्य केलं. त्यातही पहिल्या वर्षांत कर्जहप्ते नाहीत आणि पुढची चार र्वष समान हप्त्यांमधून हे कर्ज मी फेडायचं आहे. इंटलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजेच बौद्धिक मालमत्ता तारण म्हणून ठेवून दिलेल्या या कर्जाचं अशा तऱ्हेचं निदान भारतातलं तरी हे पहिलंच उदाहरण. (यातून कलावंत, क्रिएटिव्ह लोकांसाठी भविष्यात किती असंख्य दरवाजे उघडू शकतात! ‘कुहू’चे महत्त्व यासाठीही.)
‘कुहू’ची बाल-आवृत्ती वेगळी काढण्याची गरज का वाटली?
‘‘आपली मुलं बुद्धिमान बनावीत असं वाटत असेल, तर तुम्ही त्यांना परीकथा ऐकवा आणि ती सर्वश्रेष्ठ बनावीत असं वाटत असेल तर त्यांना अजून जास्त परीकथा ऐकवा!’’ आल्बर्ट आइन्स्टाईनचं हे वाक्य मला फार आवडतं. मुलांना खूप कुतूहल असतं, त्यांना खूप प्रश्न पडतात आणि ते ती मोकळेपणाने विचारतातही. मला अशा प्रश्नांना उत्तरं द्यायला खूप आवडतं. आपल्याला आता कधीच असे प्रश्न पडत नाहीत, जसे लहानपणी पडायचे. ती कल्पनाशक्ती, ती चौकसबुद्धी आपण गमावून बसलो आहोत, हे फार तीव्रतेनं जाणवलं. रंग, शब्द, वास, आवाज.. प्रत्येक गोष्ट मुलं किती आसुसून तीव्रतेनं अनुभवतात आणि किती लहान लहान गोष्टींमधून आनंद मिळवतात. ‘भिन्न’च्या काळात मी एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांना गोष्ट सांगायला जायचे, तेव्हा त्यांना कोणत्या गोष्टी सांगाव्या हे कळतच नसे. घर-कुटुंब उद्ध्वस्त झालेली ती मुलं, पराकोटीच्या दु:खातून त्यांचं आयुष्य जात असताना त्यांना नीतिमत्ता, बोध देणाऱ्या गोष्टी सांगणं मला पटेना. मग मी पऱ्यांच्या अद्भुत जगातल्या किंवा जंगलातल्या प्राण्या-पक्ष्यांच्या गोष्टी त्यांना सांगायला लागले. त्यात ती खूप रमताहेत हे दिसत होतं. मुलांसाठी लिहायचं हे त्याच वेळी मनाशी पक्कं केलं होतं. माझी सगळ्या जगाकडे बघण्याची नजरच मुलांमध्ये राहिल्यानं बदलून गेली. हा बदल झाल्यामुळेच मी ‘कुहू’सारखी कादंबरी लिहू शकले. ‘कुहू’ची गोष्ट पऱ्या, भुताखेतांच्या काल्पनिक जगात न रमता आज प्रत्यक्ष दिसणाऱ्या पक्षी- माणूस-प्राणी यांच्या वास्तव जगाचं दशर्न घडवते. पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज, त्यांचे रंगाकार, त्यांचे स्वभाव-सवयी आणि कौशल्ये हे मोठय़ांहून लहानांना अधिक भुरळ घालणारं आणि त्यांचं कुतूहल वाढवणारं आहे. सदाहरित जंगलात घडणाऱ्या या गोष्टीत मुलं बघता-बघता हरवून जातात. पर्यावरण हा विषय आज मुलांसाठी शैक्षणिक महत्त्वाचा बनलेला आहे. जंगलाशी, इतर सजीवांशी माणसानं कसं वागावं याचं शिक्षण मुलांना या कादंबरीतून मनोरंजनाच्या वाटेनं मिळत जातं.
बाल आवृत्तीत गंभीर तत्त्वज्ञान, वर्णनात्मक भाग, मृत्यूसारखे विषय टाळून फक्त गोष्ट आहे. मूळ कादंबरीच्या कथानकाचा हा मुलांना पेलवेल एवढा सारांश आहे. तथापि ती लहानशी गोष्ट नसून दोन भागांत अनेक लहान-लहान प्रकरणे असलेली पूर्ण कादंबरीच आहे. मूळ कादंबरी तीन भागांची आणि २०८ पृष्ठसंख्येची असून बाल आवृत्ती दोन भागांची आणि १०० पृष्ठसंख्येची आहे. मुलांच्या आवृत्तीची भाषा सोपी, साधी आहे.
‘कुहू’ कादंबरी येत्या काही दिवसांतच प्रकाशित होईल. प्रोजेक्ट आता अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आला आहे. अशा वेळी या सर्व धडपडीकडे पुन्हा एकदा बघत असताना नेमक्या काय भावना मनात आहेत?
‘कुहू’ची निर्मिती प्रक्रिया खूप काही नव्याने शिकवून देणारी ठरली. खूप आनंद मिळत गेला प्रत्येक टप्प्यावर. कुहूच्या प्रवासात नकारात्मक विचारांचा हळूहळू निचरा होत गेला. नवी माणसं जोडली गेली. मी एन्जॉय करत गेले ‘कुहू’ची ही वाटचाल. चित्रकाराच्या किंवा साहित्यिकाच्या रोलमधून बाहेर पडून साऊंड रेकॉर्डिग, एडिटिंग, अ‍ॅनिमेशन वगैरे सर्व क्षेत्रांतलं काही ना काही नवं शिकायला मिळालं. नवी दृष्टी मिळाली, नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून एक आत्मविश्वास मिळत गेला.
योग्य माणसे योग्य टप्प्यावर भेटत गेली. आश्चर्य वाटेल, पण ‘कुहू’चं जवळजवळ ७० टक्के काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा झालं आहे, कारण माझे जे स्नेही परिचित मला ‘कुहू’च्या निर्मितीमध्ये मदत करत होते ते जगभर विखुरलेले होते. प्रत्येकजण आपापल्या जागी बसून काम करत होता आणि इंटरनेटचा दुवा आमच्यामध्ये होता. ‘कुहू’ कादंबरीला एक ग्लोबल प्रेझेन्स यातून मिळत गेला तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. कधी तांत्रिक अडचणी यायच्या, चुका व्हायच्या, वेळेचं, पैशांचं नुकसान व्हायचं, माणसं अपेक्षाभंग करायची, पण प्रत्येक चूक हा शिकायला मिळालेला एक नवा धडा असा दृष्टिकोन ठेवला. को-ऑर्डिनेशन, एकमेकांवरचा विश्वास, आदर यामुळे काम सोपं झालं. नवी जनरेशन सीन्सिअर, प्रोफेशनल तर आहेच, पण काम एन्जॉय करत कसं करावं हे मी त्यांच्याकडून शिकत गेले.
आत्तापर्यंत केलेल्या लिखाणात भाविनकदृष्टय़ा गुंतत जाण्याची सवय होती. त्याचा त्रासही सोसला होता, पण आपल्या कादंबरीला एक प्रॉडक्ट मानून त्याच्या निर्मितीनंतर त्यातली भावनिक गुंतवणूक बाजूला ठेवून व्यावहारिक पातळीवर तटस्थपणे विचार करू शकण्यापर्यंतचा एक प्रवासही यात झाला. तणाव होतेच. सर्वाचं कितीही सहकार्य ‘कुहू’च्या निर्मितीमध्ये असलं तरी अंतिम निर्णयाची जबाबदारी आपल्यावरच आहे, ही जाणीव मनावरचा ताण वाढवणारी होती. क्रिएटिव्ह आणि व्यावहारिक अशा दोन्ही बाजू एकाच वेळी सांभाळणं सोपं नव्हतं. लेखन, पेंटिंग्ज, नव्या माध्यमांना जाणून घेणं, तांत्रिक बाबी, पुस्तकाची मांडणी, वेबसाइट, ब्लॉग, जाहिराती, माणसांना सांभाळणं या सगळ्याचं दडपण प्रचंड होतं, पण काय हवंय हे मात्र मला निश्चित माहीत होतं. विचारांना एक ठामपणा येत गेला. स्वभावात शांतपणा आणि संयम आला, शिस्त आली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
‘कुहू’नंतर काय?
‘कुहू’च्या कल्पनेची ट्रायोलॉजी करायची कल्पना डोक्यात आहे. ‘कुहू’चं जग हे पक्ष्यांचं, आकाशात विहरणारं. त्यानंतर एक सागराच्या पोटात घडून येणारी कहाणी डोक्यात आहे. त्यापुढचं जग असेल जमिनीवरचं.
कविताचं बोलणं ऐकत असताना मला अपरिहार्यपणे पुन्हा एकदा वॉल्ट डिस्ने आठवला. तो एकदा म्हणाला होता, ''Disney Land Will Never Be Completed. It Will Continue To Grow As Long As There Is Imagination Left In The World.''

(sharmilaphadke@gmail.com)