Monday, July 9, 2012

दीपक घारे यांनी 'ललित'मध्ये लिहिलेले 'कुहू'चे सविस्तर परीक्षण


पहिली भारतीय मल्टीमीडिया कादंबरी म्हणून 'कुहू'बद्दल बरीच चर्चा झाली. चित्रं, छायाचित्रं, व्हिडिओ, अ‍ॅनिमेशन, संगीत आणि अर्थातच शब्द यांनी बनलेली ही कलाकृती आहे. त्याला साहित्यकृती म्हणत नाही, कारण त्यात सीडीसारख्या दृकश्राव्य माध्यमाचा वापरही केलेला आहे. एका बाजूला शब्दांबरोबरच रंगसंवेदनांचा अनुभव देणारं चित्ररूप पुस्तक तर दुसर्‍या बाजूला चित्रांबरोबरच गाण्यांचा समावेश असलेली सीडी अशा दुहेरी माध्यमातून 'कुहू' आकाराला आलेली आहे. या पुस्तकाच्या लेखिका कविता महाजन यांनी मनोगतात म्हटलं आहे की, 'कुहू' ही एका नव्या प्रयोगाची सुरुवात आहे. अनेक क्षेत्रांमधली मंडळी आपापल्या तर्‍हेनं यात सहभागी झाली, तसेच वाचकही सहभागी व्हावेत आणि शक्यतांच्या नव्या वाटा तयार व्हाव्यात असं त्यांना वाटतं.
कविता महाजन यांच्या नावातच कविता आहे. या काव्यात्म वृत्तीबरोबरच 'ब्र' किंवा 'भिन्न' सारख्या त्यांच्या कादंबर्‍यांमधून एक सामाजिक भानही प्रकर्षाने जाणवतं. चित्रकला ही त्यांच्या वृत्तीत कवितेइतकीच मुरलेली आहे याचा प्रत्यय 'कुहू'चं पान न पान पाहताना येतो. एका वेगळया वाटेने जाण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आणि ते लेखन आणि संकल्पन एवढ्यापुरतंच मर्यादित न ठेवता स्वत:च्या हिमतीवर ते प्रकाशित केलं हे महत्त्वाचं. त्याचं स्वागतच करायला हवं.
मात्र अशा प्रयोगांचं प्रयोगमूल्य आणि एक कलाकृती म्हणून असलेली त्यांची क्षमता यांचंही मूल्यमापन व्हायला हवं. नवीन प्रयोगांमागची कलात्मक अपरिहार्यता तपासून घ्यायला हवी. तसं झालं तरच 'कुहू'सारख्या प्रयोगांचं खर्‍या अर्थाने सार्थक होईल. त्यासाठी कुहूच्या विविध अंगांचा प्रथम विचार करू आणि मग त्यांच्या एकत्र परिणामाचे स्वरूप कसे आहे ते पाहू. कुहू सर्वप्रथम एक साहित्यकृती आहे. ती म्हटलं तर लहान मुलांची परीकथा आहे आणि मोठ्यांसाठी रूपककथाही आहे. रंगसंवेदना टिपणारी काव्यात्मता हा देखील तिचा एक विशेष आहे. इसापच्या कथेप्रमाणे कुहूची कथा उघड उघड तात्पर्य सांगणारी अथवा उपदेश करणारी नाही. पण आजचे पर्यावरणासारखे विषय त्यात येतात. मनुष्यस्वभावातले दोषही येतात. आणि मानवी दृष्टिकोनापेक्षा, पक्ष्यांच्या विहंगम उंचीवर जाऊन एका वेगळया परिप्रेक्ष्यातून मानवी जीवनाकडे बघता येते.
या कथेतला कुहू हा कोकिळ पक्षी आहे. सुरेल गाणारा, जंगलातल्या पशुपक्ष्यांच्या आधाराने वाढलेला. पक्षीजीवनाचा अभ्यास करायला आलेल्या मानुषी या मुलीवर प्रेम करणारा. प्रेमाखातर आपलं गाणं गमावून बसलेला आणि मानुषीकडून, माणसांकडून झिडकारला गेलेला. एका अर्थाने निसर्गापासून, निरागस प्रेमभावनेपासून दुरावत चाललेल्या मानवी समाजाच्या संवेदनशून्यतेची आणि त्यामुळे एका संवेदनशील, तरल कविहर्‍दयाची कुहूच्या रूपाने झालेली ही शोकांतिका आहे. कविता महाजन यांच्याच शब्दांत कुहूचं कथानक असं आहे.
सृष्टीने सार्‍या पशुपक्ष्यांना वेगवेगळे रंग दिले. कोकीळ आपल्या गाण्यातच मग्न होता. त्यामुळे तो सृष्टीकडे जाईपर्यंत तिच्याकडचे रंग संपले होते. शेवटी कावळा आणि कोकीळ काळेच राहिले. फक्त कोकिळाचे डोळे तिने लाल रंगवले. कोकीळ घरी आला तेव्हा कोकिळेला वाईट वाटलं. एक तर तो एकटाच सृष्टीकडे गेला होता आणि दुसरं कारण म्हणजे रंगवणं राहून गेल्याचा दोष त्याने कोकिळेच्या माथी मारला होता. कोकिळाचं संसारात काही लक्षच नव्हतं. तो गात, भटकत बसायचा आणि कोकिळा दिवसभर कामात असायची. कोकिळेला पिल्लं व्हायची वेळ आली तरी घरट्याचा पत्ता नव्हता. आत्ममग्न कोकिळाला कोकिळेला गाता येत नाही म्हणून तुच्छ वाटू लागली होती. (थोडक्यात सांगायचं तर कोकीळ पुरुषप्रधान व्यवस्थेतला आदर्श नवरा होता!)
शेवटी कोकिळेने आपलं एक अंडं कावळयाच्या घरट्यात ठेवलं आणि तिथेच कुहूचा जन्म झाला. पण कुहूच्या गोड आवाजामुळे बिंग फुटलं आणि हे पिल्लू आपलं नाही, हे कावळा-कावळीच्या लक्षात येताच त्यांची त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. फांदीवरून पडलेल्या कुहूला इतरांनी मदत केली. सरू खार, वानर डॉक्टर यांनी त्याला वाचवलं. नाजुका फुलपाखरू, घुबड आजोबा, बावरा ससा असे आणखीही काही मित्र त्याला मिळाले. कोतवाल पक्षी अंगारक याने त्याला जगण्याचे काही प्राथमिक शिक्षण दिले, भिंगार सरड्याने कुहूला जगण्याचे धडे शिकवले. या सार्‍यांनी कुहूला एक नवा आत्मविश्वास दिला. (या सार्‍या प्राणिमित्रांना लक्षात राहील असं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आणि ओळख दिलेली आहे. त्यामुळे 'जंगल बुक'मधल्या मोगलीची काळजी घेणार्‍या प्राणिमित्रांची आठवण होते.)
सरू खारीबरोबर कुहू एका आंब्याच्या झाडाच्या ढोलीत राहू लागला. आता त्याच्या गळ्यातून मोकळेपणानं सूर बाहेर पडायला सुरुवात झाली. आपल्या सुरांच्या रंगीत रेशीम लडींमध्ये तो गुरफटून राहू लागला. कुहू आपल्या परीने उडायचा प्रयत्न करायचा. त्याची ती धडपड बघून कोतवाल पक्षी अंगारकाने त्याला स्वत:हून शिकवलं. सृष्टीकडे जाण्याचा प्रवास एकट्याने करू शकेल इतपत त्याची तयारी अंगारकाने करून घेतली. बेपर्वा आणि निष्ठुर कावळयांना अद्दल घडवायची असेल तर कुहूनं लवकर सगळं शिकून खंबीर झालं पाहिजे असं कोतवाल सरांचं मत होतं.
कुहू लांबच्या प्रवासाला निघाला. खूप पाहिलं. जंगलाच्या, पक्षी-प्राण्यांच्या, माणसांच्या गोष्टी ऐकल्या. अशा सगळया गोष्टींची एक मोठी लायब्ररीच त्याच्या डोक्यात तयार झाली. त्याला अनेक प्रश्न पडले. सृष्टीचं नवल मनात मावेनासं झालं. सात जंगलं, सात नद्या, सात डोंगर ओलांडल्यानंतर कुहू सृष्टीच्या चित्रशाळेत येऊन पोहोचला. सृष्टीने कुहूची सगळी हकिकत ऐकून घेतली. त्याला काय हवंय विचारलं. कुहूला त्याचं गाणं वाढवायचं होतं, पण त्यासाठी स्वत: मेहनत करायची आणि गुरूचा शोध घ्यायची त्याची तयारी होती. त्याची स्वावलंबी वृत्ती पाहून सृष्टी खूष झाली. तिने एक निळेभोर रंगीत पिस कुहूच्या डाव्या पंखात डकवलं आणि सांगितलं, "या पिसामुळे तुझं गाणं जादुई बनेल. जगातल्या ज्या कुठल्या गोष्टीचा स्पर्श या पिसाला होईल त्या साध्यासुध्या गोष्टीचंही एक सुरेल शब्दांचं गाणं होईल." कुहूचा परतीचा प्रवास फार आनंदाचा झाला, कारण निळया पिसाचा कशालाही स्पर्श झाला की त्याचं गाणं होऊ लागलं. (एखाद्या रूपककथेप्रमाणे आत्मभानाचा आदिबंधात्मक प्रवास इथे येतो.)
कुहूचं असं आनंदमय गाणं चालू असताना एक दिवस जंगलाचा अभ्यास करण्यासाठी काही तरुण माणसं आली. त्यांच्यामधलीच एक होती मानुषी. हळूहळू कुहूच्या गाण्याने मानुषीला वेड लावलं. असं गाणं तिनं कधीच कुणा पक्ष्याकडून ऐकलं नव्हतं. एकदा कुहू तिच्या दृष्टीला पडला. त्याच्या गळयावर लाल रेष होती आणि पंखांमध्ये निळं पीस होतं. कुहू मानुषीच्या रूपाने माणूस प्रथमच पाहत होता. या नव्या प्राण्याची त्याला प्रथम भीती वाटली, पण नंतर लक्षात आलं की ही माणसं जमलं तर आपल्याला मदतच करताहेत. कुहूला मानुषीबद्दल आकर्षण वाटू लागलं. प्रेमभावनेने त्याला भोवतालचं जग अधिकच सुंदर वाटू लागलं. या नात्यामध्ये अडसर होता तो भाषेचा. कुहूला माणसांची भाषा कळत नव्हती आणि मानुषीला कुहूची. मग मैनेनं कुहूला माणसांची भाषा शिकवली. त्यामुळे कुहूला मानुषीशी संवाद साधता येऊ लागला. पण भाषा आणि माणसांचं वागणं यातल्या विसंगतीचं गूढ काही त्याला उमगलं नाही. (संवादभाषा हा इथे कथेचा एक महत्त्वाचा घटक बनतो.)
मानुषीकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कुहू उदास गाणी गाऊ लागला. इतर प्राण्यांना माणूस शत्रू वाटत होता. पण कुहूला माणसांचे दोष माहीत असूनही त्यांच्याबद्दल प्रेम वाटू लागलं. आपल्या प्रेमाने माणसांची वागणूक आपण बदलू शकू असा त्याला विश्वास वाटू लागला. आपलं माणसात रूपांतर झालं तर मानुषी आपल्या प्रेमाचा स्वीकार करेल याबद्दल त्याला खात्री होती. इतर पशुपक्ष्यांना मात्र हा वेडेपणा वाटत होता. कुहू मग सृष्टीकडे गेला. सृष्टीने त्याला माणूस बनवायचं कबूल केलं, पण एका अटीवर. माणूस होण्याच्या बदल्यात त्याला त्याचं गाणं गमवावं लागणार होतं. माणूस होण्यासाठी एवढी मोठी किंमत त्याला द्यावी लागणार होती. कुहू माणूस बनला आणि मानुषीकडे गेला. मानुषीच्या मनात जोडीदाराच्या ज्या कल्पना होत्या त्यात गाणं गमावलेला एक पक्षी कसा बसणार? कुहूचं प्रेम हा तिला एक वेडेपणाच वाटला. तिने कुहूला झिडकारलं. (कुहून परधर्मात प्रवेश केला होता. परधर्मो भयावह: हा अनुभव त्याला येणं क्रमप्राप्त होतं.)
पुन्हा पक्षी बनण्यासाठी कुहू सृष्टीकडे गेला. त्याला सृष्टीने सुनावलं की पक्ष्याचं माणूस बनणं आणि माणसाचं पक्षी बनणं हा काही पोरखेळ नव्हे. माणसाच्याच रूपात कुहूने अखेरचे दिवस काढले. गाणं त्याच्या सोबतीला शेवटपर्यंत राहिलं. त्याचा गाता गळा गेला तरी असंख्य कोकिळांच्या रूपाने ते गाणं जिवंत राहिलं. निळया पिसाच्या रूपाने मानुषीला निसर्गातून ते ऐकू येत राहिलं.
(माणसाच्या अवगुणांवर मात करणारी प्रेमभावना व्यक्त करून कुहूची कथा एक पर्यावरणीय नैतिक भूमिका घेऊन संपते.)
कुहूचं कथानक थोडक्यात असं आहे. त्यातल्या अंतर्गत सूत्रांकडे वळण्यापूर्वी या कथेतल्या पशूपक्ष्यांच्या व्यक्तिरेखांबद्दल लिहिलं पाहिजे. यातल्या घुबडआजोबांना, भिंगारसरड्याला, कोतवाल सरांना एक वेगळी ओळख आहे. घुबड आजोबा विचारी, दुसर्‍याच्या मताचा आदर करणारे आहेत. माणूस होण्याचा कुहूचा अट्टहास पाहून घुबडआजोबा विचारात पडतात. हे चांगलं की वाईट याचा निर्णय ते काळावरच सोपवतात. कोतवाल पक्ष्याचं नाव अंगारक पडलं ते त्याच्या लालबुंद डोळयांमुळे. कोतवाल सर झाले ते त्यांच्या सामाजिक शिकवणीमुळे. पक्ष्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे, कुणी संकटात असेल तर त्याला वाचवलं पाहिजे, छोट्या पिल्लांना उडणं-गाणं-कसरती असं सगळं शिकवलं पाहिजे, अशी सगळी कोतवाल  सरांची मतं आहेत. कावळयांसारख्या शत्रूंना अद्दल घडवायची असेल तर खंबीर होणं महत्त्वाचं असा त्यांचा रोखठोक आणि कृतिशील विचार आहे. भिंगार सरडा हा सुद्धा घुबड आजोबांप्रमाणे विचारी आहे पण तो माणसांकडे वाकड्या नजरेनेच पाहतो. माणसांच्या खोटेपणाबद्दल आणि मतलबीपणाबद्दल सरडा नेहमी बोलत असतो. रंग बदलणार्‍या सरड्याने माणसांचं जग जवळून पाहिलेलं आहे आणि कुहूसारखे त्याच्या मनात माणसांविषयी कसलेही गोड गैरसमज नाहीत. या आणि अशा अनेक व्यकितरेखा कुहूच्या कथेला एक वेगळा जिवंतपणा देतात. या कथेतली सृष्टी ही देवता एखाद्या धर्मनिरपेक्ष देवतेसारखी (सेक्युलर गॉडेस) आहे. तिला घुबड आजोबा, भिंगार सरड्यासारखा स्वत:चा चेहरा नाही. तिचं अस्तित्व मात्र निसर्गाच्या प्रत्येक घटकात जाणवत राहतं. सृष्टीच्या या कथेतील व्यक्तिरेखेत एक सौंदर्यपूर्ण निर्मितीचे तत्त्व दडलेले आहे. ती सजीवांना रंग बहाल करते. कुहूच्या सांगण्यावरून सृष्टीरचनेत कुहूचा माणूस करून थोडाफार हस्तक्षेपही करते. पण सृष्टीच्या निर्मितितत्त्वात संहारावर मात करणारा एक आश्वस्त सूरही आहे. वानर डाक्टरांचा दवाखाना आणि त्यांचे रुग्ण, चोचीला बँडेज बांधल्यामुळे बोबडं बोलणारा सुतारपक्षी, डोंगरी मैना, नाजुका फुलपाखरू या व्यक्तिरेखा कथानक पुढे नेण्यापेक्षा जंगलाच्या वातावरणाला अधिक रंजक करतात. त्यात एक प्रकारचा निसर्गदत्त निरागसपणा आहे. लुईस करालच्या "एलिस इन वंडरलँड" किंवा रूडयार्ड किपिलंगच्या "जंगलबुक" मधील पात्रांची आठवण करून देणारा.
कविता महाजन यांनी कुहूची कथा लिहिताना मानवी वर्तनावर, त्याच्या सरड्याप्रमाणे रंग बदलण्याच्या वृत्तीवर, आपला कायदा इतरांवर लादण्याच्या बळजोरीवर, तुच्छतावादी वृत्तीवर आणि निसर्गाला पुस्तकी दृष्टिकोनात बंदिस्त करून खर्‍या निसर्गाला पारखे होण्याच्या विनाशकारी दुर्बुद्धीवर पशूपक्ष्यांच्या तोंडून वेळोवेळी भाष्य करण्याची संधी साधली आहे. या कथेची नायिका मानुषी ही आत्मसंतुष्ट, कुहूसारख्यांच्या निरपेक्ष प्रेमाची कदर नसलेली, शहरी जीवनातले अग्रक्रम जोपासणारी स्त्री आहे. आजच्या माणसाचे ती प्रतिनिधित्व करते.
प्रवास हे असंच या कथेतलं आणखी एक सूत्र आहे. कुहूच्या प्रवासाचं वर्णन येतं ते असं - जाताना त्याला कितीतरी प्राणी दिसले. नवे नवे स्थलांतर करून येणारे पक्षी भेटले. भेटणार्‍या प्रत्येकाच्या गोष्टी ऐकून एक मोठी लायब्ररीच त्याच्या डोक्यात तयार झाली. नद्या, तलाव, डोंगर, दर्‍या पाहून सृष्टीनं निर्माण केलेल्या वेगवेगळया गोष्टींचं नवल कुहूच्या मनात मावेनासं झालं. इकडे सृष्टी आपल्या कामात मग्न होती. ती आपल्या जीवसृष्टीतल्या बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करत होती. तर काही पशू-पक्ष्यांमध्ये, झाडाझुडपांमध्ये, माणसांमध्ये नव्या सुधारणा घडवून या जीवांना अधिक योग्य, अधिक चांगलं कसं बनवता येईल याबाबतही तिचे पुष्कळ प्रयोग सुरू होते. या प्रवासाचं फलित सांगणारं पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, "कुहू जेव्हा सृष्टीच्या चित्रशाळेजवळ पोहोचला, तेव्हापर्यंत त्याला पुष्कळ गोष्टी करता येऊ लागल्या होत्या. तो एक हुशार पक्षी बनला होता." या प्रवासात नैसर्गिक पर्यावरण व्यवस्थेचा, इको सिस्टीमचा आजचा दृष्टिकोण नकळतपणे आलेला आहे. स्थलांतरीत पक्षी, लायब्ररी यातून सूचित होणारा निसर्गाचा अभ्यास वेगवेगळ्या शब्दांतून व्यक्त होणारी जैवविविधता, गोष्टीचं नवल - सेन्स ऑफ वंडर - सृष्टी साधत असलेला जैविक विकास अथवा डार्विनिझम हे सारं अप्रत्यक्षपणे या प्रवासात आलेलं आहे.
या पुस्तकातलं सृष्टीचं प्रारूप परीकथेतल्या देवतेपेक्षा पृथ्वी हीच एक सजीव गोष्ट आहे असं मानणार्‍या जेम्स लव्हलाकच्या 'गाया' ( Gaia)  संकल्पनेशी मिळतंजुळतं आहे. कुहूचा आणखी एक प्रवास आहे. तो म्हणजे कुहूचं माणूस होणं आणि पुन्हा पक्षी होण्याचे दरवाजे बंद होणं - पक्ष्यांचं जग आणि माणसांचं जग आणि या दोन्ही जगांमधले विरोधाभास दूर करून सृष्टीच्या एकात्म, सुंदर अनुभवासाठी प्रयत्नशील राहणं असा हा आत्मिक प्रवास आहे. तो कुहूच्या कथेला रंजनात्मक परीकथेपेक्षा अधिक उंचीवर नेऊन ठेवतो.
भाषा हे या कथेचं आणखी एक सूत्र. भाषा अनेक प्रकारची असते. शब्दांची, भावनांची आणि भाषिक अडसरही अनेक असतात. भाषा भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात तशीच ती भावना लपवण्यासाठी सुद्धा वापरतात. भाषिक संवाद हा फक्त एक प्रकारचा संवाद असतो. भाषेने सर्व प्रश्न सुटतातच असं नाही. कुहूचं गाणं ही सुद्धा त्याची एक भाषाच आहे. माणसांची भाषा शिकू इचिछणार्‍या कुहूला मैना सांगते, "माणसाच्या अनेक भाषा आहेत. आपलीच भाषा श्रेष्ठ असं त्यांना वाटत असतं. बोलीभाषेत बोलणारी माणसं गावंढळ आहेत असं ते समजतात. माणसांच्या उच्चारावरून त्यांना जोखलं जातं. बोबडं आणि तोतरं बोलणार्‍यांना लोक हसतात." सगळे भाषिक पूर्वग्रह मैनेच्या या बोलण्यात आलेले आहेत. कुहू माणसांची भाषा शिकतो खरा पण त्यातली वैय्यर्थता त्याला कळून चुकते. भाषेतून प्रेम सांगता येतं पण एखाद्याच्या मनात प्रेम निर्माण करायला भाषा अगदीच निरुपयोगी आहे, हे त्याला पटतं. पक्ष्यांच्या इवल्याशा मेंदूतील नैसर्गिक ऊर्मीना माणसाच्या बुद्धीची जोड देऊन त्याला नवी भाषा घडवायची आहे, विकास साधायचा आहे. निराश होऊन कुहू जंगलात परत येतो तेव्हा निरुपयोगी ठरलेले माणसांचे शब्द एका सागाच्या मोठ्या पानात बांधतो आणि घुबडआजोबांजवळ झाडाच्या ढोलीत ठेवून देतो. या हृदयीचं त्या हृदयी आपोआप पोचणारं विशुद्ध संगीत हीच खरी हृदयाची भाषा, बाकी सार्‍या भाषा एकरूपता साधण्याऐवजी बुद्धीभेदच करतात असाच काहीसा संदेश कुहूच्या भाषापुराणातून मिळतो.
कुहूचं माणसात रूपांतर म्हणजे एक प्रकारे स्वत:चा पक्षीधर्म सोडून मनुष्यधर्म स्वीकारण्यासारखंच होतं. इतर पशुपक्ष्यांनी असा वेडेपणा न करण्याचा सल्ला दिला पण तो कुहूला पटला नाही. आपण कितीही उदात्त भावनेने दुसर्‍याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला तरी दुसरे आपल्याला स्वीकारतातच असं नाही. कारण स्वार्थाने ते आंधळे झालेले असतात. अहंकार आणि पूर्वग्रह आड येतात. कुहूचं तसंच झालं. त्यासाठी त्याला गाण्याची किंमत मोजावी लागली. आणि परतीच्या वाटाही बंद झाल्या. तो स्वधर्माला पारखा झाला आणि दुसर्‍या धर्माने त्याला स्वीकारलं नाही. कोयल म्हणूनच निष्कर्ष काढते की, "पक्ष्यांनी कधीही माणसाच्या प्रेमात पडू नये आणि माणूस होण्याचा खुळेपणा तर कधीच करू नये. पक्ष्यांनी पक्षीच राहावं आणि पक्ष्यांसोबतच राहावं. माणसांच्या नादी लागून आपले पंख आणि गाणं गमावून बसू नये."
माणसाने आपला विनाशी अहंकार सोडून सृष्टीच्या विकसनशील प्रेमभावनेशी, कुहूच्या जीवनगाण्याशी नव्याने नातं जोडावं अशी पर्यावरणविषयक नैतिक भूमिका इथे मांडलेली आहे.
कुहूच्या शब्दरूपाचा विचार केल्यानंतर त्याच्या नव्या घाटाचा, मल्टीमीडिया कादंबरीच्या यशापशाचा मागोवा घेणे इष्ट ठरेल. मल्टीमीडिया अशी त्याची जाहिरात केल्याने वाचकांच्या अपेक्षा खूप उंचावलेल्या होत्या. ज्यामध्ये व्हिडिओ, ऑडिओ, प्रिंट अशा माध्यमांचा वापर केलेला आहे ती मल्टीमीडिया कादंबरी एवढीच व्याख्या असेल तर ही तशी कादंबरी आहे. पण कलात्मक एकत्रित परिणाम साधणारी, इतर कोणत्याही प्रचलित माध्यमांपासून काहीतरी पूर्णपणे वेगळा अनुभव देणारी अशी ही कादंबरी आहे का? तर तशी ही कादंबरी नाही असंच म्हणावं लागतं. फार तर ती दृश्यमाध्यमाचा, कथाचित्रांचा मुक्त वापर केलेली एक चित्रमय कथा आहे आणि एका विवक्षित पातळीवरचा संवाद साधण्यात ती यशस्वी झाली आहे एवढंच. मल्टीमीडिया हा शब्द आज रूढ झालेला आहे. पण याची चाहूल मार्शल मकलुहानच्या "मीडियम इज द मेसेज" आणि "द गटेनबर्ग गलक्सी" या पुस्तकांद्वारे १९६०च्या दशकातच लागलेली होती. चित्रपट आणि व्हिडिओ यांनी दृश्यभाषेवरच नव्हे तर ग्रांथिक भाषेवरही आपला प्रभाव पाडला आणि एकविसाव्या शतकात अनुभव विविध दृकश्राव्य माध्यमांमधून एकत्रितपणे घेणं हा वास्तव अनुभव बनला. इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हिडिओ गेम्स हा त्याचा आणखी एक विस्तार. व्हिडिओ गेम्स आणि ग्राफिक नॉव्हेल्स यांचा इतिहास गेल्या पंचवीस वर्षांचा आहे. दृश्यकलेत मांडणशिल्पे आणि त्यातही व्हिडिओ इन्स्टालेशन्समधून मल्टी मीडिया प्रस्थापित झाला. यातून जी एक नवी संवेदनशीलता निर्माण झाली त्यात 'कुहू' कुठे बसते? मराठी वाचकांना मल्टीमीडियाची ही पार्श्वभूमी फारशी परिचित नाही. त्यामुळे 'कुहू' वाचून, पाहून आणि ऐकून मल्टीमीडियाबद्दल वाचकांची काही वेगळी समजूत होण्याची शक्यता आहे. काहींना तिच्या प्रयोगशीलतेचं अप्रूप वाटेल तर काहींना तो एक व्यर्थ खटाटोप वाटेल. पण चित्रमय कादंबरी म्हणून तिच्याकडे बघितलं तर 'कुहू'मधल्या जमेच्या बाजू दिसतील.
या कादंबरीतील वर्णनं पाहिली तर ती दृष्य अनुभवाला अधिक जवळची आहेत. वार्षिक उत्सवासाठी जमलेल्या पक्ष्यांचे रंग. हिरव्यागार पानोळया, निळं आकाश, कैर्‍यांचे घोस, केशरी आंब्यांमध्ये होणारं त्यांचं रूपांतर. आभाळभर हिरव्यागार पोपटांचा थवा. सरकत जाणार्‍या ढगांच्या सावल्या. कुहू माणूस होतानाचा लालबुंद आक्रोश. प्रकाशाची प्रसन्न रेषा. अशी अनेक उदाहरणं देता येतील. या वर्णनांमधला आशय सोबतच्या अर्थपूर्ण चित्रांमुळे अधिक गडद होतो. चित्रघटकांची रचना, पोत आणि रंग यांचा परिणामकारक वापर कविता महाजन यांनी केलेला आहे. कुहू झाडावरून उडता उडता खाली पडतो तेव्हाची त्याची भयभीत अवस्था, लाल विटकरी रंगाच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या काळया सावल्या आणि 'आई....' ही आर्त हाक मोठ्या अक्षरांमध्ये दाखवून नाट्यपूर्ण परिणाम साधला आहे. रितेपणाचं काहूर दर्शवणारं निळंभोर आकाश हे आणखी एक असंच परिणामकारक उदाहरण. कधीकधी काही पानांवर पशुपक्ष्यांच्या चित्रांपेक्षा अमूर्त आकार आणि रंगसंगतीतून, योग्य तिथे काळया करड्या रंगछटा वापरून कुहूच्या भावस्थितीचं नेमकं चित्र उभं केलं आहे. पशुपक्ष्यांच्या व्यक्तिरेखांचा उल्लेख यापूर्वी केलाच आहे. घुबडआजोबा, कोतवाल सर, भिंगार सरडा यांना चित्रांमध्ये वास्तववादी शैलीतच चितारलं आहे. कार्टून्समध्ये जसं एक वेगळं व्यक्तिमत्व दिलेलं असतं तसं इथे केलेलं नाही. कारण पुस्तकाच्या एकूण चित्रवृतीशी ते विसंगत ठरलं असतं. पुस्तकात अधूनमधून कविता येतात. त्यांच्यासाठी सुलेखनशैलीचा म्हणजेच कॅलिग्राफीचा वापर केलेला आहे. पण आकर्षक मांडणीपलीकडे ही कॅलिग्राफी फारशी जात नाही.
पुस्तकाबरोबर सीडी दिलेली आहे. आवाज आणि संगीताची एक नवी मिती त्यामुळे मुद्रित कथेला लाभते. पण तशा पुस्तक आणि सीडी या दोन्ही गोष्टी स्वतंत्रच राहतात. आपल्याकडे रंगीत चित्रे असलेली लहान मुलांची भरपूर पुस्तके प्रकाशित होतात. पण लेखकाइतकीच प्रतिष्ठा कथाचित्रकाराला किंवा इलस्ट्रेटरला मिळत नाही. लेखनाइतकीच अभिजात दर्जाची निर्मिती कथाचित्रकार करू शकतो याची जाणीवच इथे रुजलेली नाही. पाश्चात्त्य देशातील अलन फ्लेचरचं "द आर्ट ऑफ लुकिंग साईडवेज" किंवा लिआन लिओन्नीची मुलांसाठी चित्रित केलेली पुस्तकं अशी अनेक उदाहरणं देता येतील. चित्रांमध्ये आकर्षकतेच्या पलीकडे असलेली आशय आणि अनुभव व्यक्त करण्याची ताकद अमर्याद असते. कविता महाजन यांच्या पुस्तकामध्ये कथाचित्रकलेच्या मर्यादा ओलांडून दृश्य अनुभव घेण्याची आणि दुसर्‍यांना देण्याची ऊर्मी प्रकर्षाने जाणवते आणि त्यात त्यांना मिळालेलं यशही कमी महत्त्वाचं नाही. अशी एक बहुआयामी संवेदनशीलता इथे रुजली तर उद्या खर्‍या अर्थाने मल्टीमीडिया कादंबरी निर्माण होईलही.  

Tuesday, June 19, 2012

परीक्षण - संजय भास्कर जोशी ( ललित, जानेवारी २०१२ )

पुस्तक परीक्षण, समीक्षा, पुस्तक परिचय या सगळया सगळयाच्या पलीकडे जाऊन लिहायला हवं कविता महाजन यांच्या 'कुहू'विषयी. तसं पाहिलं तर हे एक दोनशे पानी पुस्तक. एक कादंबरी. छान आर्ट पेपरवर छापलेली. पानोपानी चित्रं असलेली. अत्युत्तम निर्मितिमूल्य असलेली. बहुतेक मराठीत प्रथमच त्रिमिती (थ्री डायमेन्शनल) आणि अतिशय आकर्षक मुखपृष्ठ असलेली. लहान मुलांना आकर्षित करेल अशी, पण मोठ्यांनाही विचारात टाकेल अशी... आणि त्यासोबत याच पुस्तकाची डीव्हीडी. ज्यात अ‍ॅनिमेशन, मधुर आवाजातलं वाचन आणि उत्तम संगीत आणि काव्यगायन असल्यानं सुरेल ओघात पुढे सरकणारी... पण, इतकंच? इतकंच आहे हे सगळं? छे. मला विचाराल तर 'कुहू' हे एका कलंदर, मनस्वी कलावंताचं एक खुळं आणि खुळावणारं स्वप्न आहे. पण अशा स्वप्नांचं व्यावहारिक जगात आणि बाजारात तितक्याच आत्मीयतेनं स्वागत आणि मूल्यमापन होतं का?
कविता महाजन यांना ही निर्मिती करताना हे सगळं जाणवलं का नसेल? खरं उत्तर द्यायचं तर नसेल जाणवलं. कारण अशा व्यावहारिक जाणीवा बाळगल्या तर अशी मनस्वी निर्मिती शक्यच नसते. गुणात्मक मूल्यामापन घटकाभर बाजूला ठेवा, पण या उत्कट मनस्वी निर्मितीबíल कविता महाजन यांना कुर्निसात. एकदम दिलसे कुर्निसात! असलं रूपक काव्य, हो, कविता महाजन याला भले कादंबरी म्हणो पण यात मला एक रूपकात्मक गीतकाव्यच दिसतं, जे अलीकडे दुर्मिळ होत चाललंय. तर असं मनस्वी गीतकाव्य अशा प्रकारे निर्माण करायला खुळेपणाच हवा. असो. सांगायचा मुद्दा असा, की कविता महाजन निर्मित 'कुहू' या निर्मितीला सामोरं जायचं तर तशीच मनस्वी उत्कट मानसिकता आपलीही हवी.
मी याला निर्मिती म्हणतोय ते जाणीवपूर्वक. कारण हे काही केवळ एक पुस्तक नव्हे. केवळ मलिटमीडिया डीव्हीडी नव्हे. साहित्य, चित्र, संगीत अशा अनेक कलांचे ते एक कलात्मक आणि प्रातिभ फ्यूजन आहे. हा प्रयोग अपूर्व आहे. त्याचे गुणात्मक मूल्यमापन बाजूला ठेवूया घडीभर, पण आपणच कदाचित कमी पडतो, या आणि अशा प्रयोगाला दाद धायला, हे कबूल करूया.
आता थोडं प्रॅक्टीकल बोलतो. या प्रयोगाचं प्रेझेंटेशन आणि मार्केटिंग करताना थोडी गडबड झालीच. अर्थात हे काही साहित्यविश्वाच्या करंटेपणाचं समर्थन नव्हे. आम्ही दाद देण्यात कमी पडलो हे लपवण्यात अर्थ नाही. या सगळयाचं एकत्र बंडलिंग करून पंधराशे रुपयाची (एरवी खरं तर कमीच, पण मराठी खिशाला -) भली मोठी वाटणारी किंमत याला चिकटवलीत. असो.
काय आहे हे 'कुहू' प्रकरण? म्हटलं तर ही एक भावमधुर कहाणी आहे. प्रेमकहाणी आहे. प्रेम या अतिमधुर भावनेच्या मुळापर्यंत पोचणारी भावविभोर कहाणी आहे. एक पक्षी आणि एक माणूस यांच्यातल्या मधुर प्रेमाची गोड गोष्ट आहे. पण म्हटले तर याहून बरेच काही आहे. एक अतिसुंदर रूपककथा आहे. कलावंताच्या मानसिकतेची कैफियत आहे. पण त्या रूपकाचे नंतर बघू, आहे त्या स्वरूपात ही एक फार गोड गोष्ट आहे. 'कुहू' या कोकिळ पक्ष्याने आपले सारे आदिम कोवळेपण, निरागसपण जपत प्रेम या भावनेला दिलेले अतिरम्य काव्यरूप म्हणजे कविता महाजन यांची ही 'कुहू' कादंबरी होय. प्रेमापोटी एखादा कुणी आपले स्वत्व मिटवतो आणि (अर्थातच) शेवटी मातीमोल (इथे अक्षरश:) होतो त्याची ही कहाणी आहे. कुहू नावाच्या कोकिळ पक्ष्याची आणि मानुषी नावाच्या मुलीची प्रेमकहाणी आहे.
कविता महाजन ही 'ब्र' या कादंबरीमुळे प्रसिद्ध झालेली लेखिका असली तरी मुळात ही संवेदनाशील कवयित्री आणि चित्रकारच आहे हे या कादंबरीच्या निमित्ताने अधोरेखित झाले ते बरेच झाले. 'कुहू'च्या निमित्ताने कविता महाजन यांनी केलेली चाळीस-बेचाळीस तैलरंगातली पेंटिंग्ज बघताना हे जास्तच जाणवते. आणि या कादंबरीतली गीते वाचताना किंवा ऐकताना त्यांच्यातली कवयित्री भावते.
झुळूक आली इवली इवली
तिचेच झाले गाणे
गाण्यासोबत गाण्यामधुनी
अपुले येणे जाणे

अशा ओळीमधून किंवा
मनात काही मावत नाही
येते उसळुनी वरती
मनात मावेना आभाळ
मावत नाही धरती

अशा ओळींतून कविता महाजन यांचे काव्यव्याकुळ मन जाणवत राहते. या कादंबरीत जागोजागी अशा सुरेख अन सुरेल कविता येत राहतात. आणि चिमुकला कुहू नावाचा कोकिळ आणि मानुषी ही तरुणी यातले नाते सुरेल करत राहतात. मोह आवरत नसल्याने एक गोष्ट इथेच नमूद करतो. याच कादंबरीबरोबर जी दृक-श्राव्य डीव्हीडी मिळते त्यात कविता महाजन यांच्या या कादंबरीतल्या कवितांना जे सुमधुर श्राव्य रूप दिले आहे ते विलक्षण सुरेल आहे. उदाहरणार्थ, या ओळी -
रे निळया आकाशी स्वरा,
थांब ना,
बोल ना जरा...
हे रितेपणाचे काहूर
अंतरी तोल ना जरा

या ओळींना आरती अंकलीकरांनी जे स्वररूप दिले आहे ते व्याकूळ करणारे आहे. घायाळ करणारे आहे. आणि त्याचबरोबर मन उन्नत करणारा अनुभव देणारे आहे. (या डीव्हीडीमधला दृक भाग मात्र प्रभाव टाकत नाही. डोळे मिटून ऐकले तरी ही डीव्हीडी उत्तम आनंद देते. उलट तीच तीच चित्रे पुन्हा पुन्हा पाहून कंटाळाच येतो. असो.) म्हटले तर ही पक्ष्याची, सृष्टीची, निसर्गाची गोड गोष्ट आहे. म्हटले तर मनस्वी कलावंताच्या व्याकूळ करणार्‍या दुर्दैवाची कहाणी आहे. रूढार्थाने रूपककथा नाही म्हणणार मी हिला. कारण यात सृष्टी, प्राणी, पक्षी यांच्यावरचे मानवी भावभावनांचे आणि स्वभावाचे आरोपन अपरिहार्य नाही. कुहू हे कशाचे रूपक आहे आणि त्या रूपकाद्वारे कविता महाजन काय सांगू पाहतात त्याचे अन्वयार्थ लावणे हा ज्याच्या त्याच्या प्रतिभेचा आणि मगदूराचा प्रश्न आहे.
मला जाणवलेले एक वैशिष्ट्य सांगतो. ते आणि तेच निर्णयक आहे असा अर्थातच दावा नाही. पण मला असे जाणवले, की कुहू हा मधुर गाणारा कोकिळ मानुषीच्या प्रेमाखातर आपले पक्षीपण आणि गाणे या दोन्हीचा त्याग करून सृष्टीदेवतेच्या आशीर्वादाने न गाणारा माणूस होतो यातच या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत दडला आहे. प्रेम आणि त्यातून येणारे समर्पण आणि शरणागतता हा या कादंबरीचा एक विषय आहे. (प्रेमातून येणारे समर्पण सर्जनशील असते तर स्वत्वच मिटवणारी शरणागतता अंतिम र्‍हासाचे बीज असते असे मला वाटते.) कारण माणूस झालेला आणि त्यासाठी आपल्या गाण्याचा बळी देणारा कुहू मानुषीला आवडेल ही कुहूची अपेक्षाच चूक आहे. त्यामुळे या कहाणीचे आधी भावमधुर आणि भावविभोर असणारे रूप शेवटी भलतेच भाबडे आणि बाळबोध होते. कुहूला सहानुभूती देण्याच्या नादात लेखिकेला त्यात मानव आणि निसर्ग, मानवाचे निसर्गावर आक्रमण वगैरे आदर्शवादी भाग आणणे अटळ होते. ते तर जास्तच बाळबोध होत जाते. शेवटी वैतागलेली मानुषी त्रासून कुहूला विचारते, "काय पाहिजे होतं तुला?" तेव्हा कुहू म्हणतो ते महत्त्वाचं आहे. कुहू म्हणतो, "काही नाही मानुषी. तुला जे वाटतंय ते काहीच नाही. तुम्हा माणसांच्या जगातल्या देवाण-घेवाणी मला कधीच पाहिजे नव्हत्या. तुमच्या जातीपाती, धर्म, लग्न, पैसे कमावणं... या सगळयात मला काही रस नव्हता... मला फक्त गायचं होतं मानुषी... अधिक चांगलं गायचं होतं... मला माझं गाणं आभाळासारखं अवघ्या पृथ्वीवर पसरवायचं होतं...!"
या कहाणीची मेख इथे आहे. कारण कुहूचं खरं प्रेम आपल्या गाण्यावर आहे का त्याच्या पक्षी असतानाच्या गाण्यावर भाळलेल्या मानुषीवर आहे हेच कुहूला समजत नाही, किंवा ठरवता येत नाही. आणि तिथेच कुहूच्या दुर्दैवाची बीजं पेरली जातात. अशा प्रेमकहाणीचे दुर्दैवी अंत अटळ असतात. खरे तर त्या दुर्दैवाला माणसाच्या स्वार्थी आणि मतलबीपणाचे (जे खरे असले तरी) रंग देणे निष्फळ तर असतेच पण निरर्थक असते. कारण कुहू म्हणतो तसं त्याला फक्त चांगलं, अधिक चांगलं गाऊन आभाळासारखं पृथ्वीवर पसरवायचं होतं तर त्याने कधीच मानुषीला मिळवण्यासाठी आपल्या गाण्याचा बळी नसता दिला. नकळत अशी ही कहाणी समाजाच्या असंवेदनशीलतेबरोबरच कलावंताच्या मूल्यर्‍हासाची होत जाते. मानुषीच्या निमित्ताने माणूसजातीवर उपरोधाचे कोरडे ओढणारा कुहूच स्वत: स्खलित आहे, स्वप्नच्युत आहे हेच क्रूर वास्तव आहे. कुहूचे अंतस्तर असे जखमी करणारी सत्ये समोर आणतात. ते लेखिकेला असेच अभिप्रेत असतील असे मात्र नव्हे. कारण लेखिकेची विनाअट सहानुभूती कुहूलाच आहे.
पण तरीही नकळत कलावंताच्या मूल्यर्‍हासाचे वास्तव देखिल समोर येतेच. या पुस्तकाची ही पस्तुरी आहे. कलावंत आणि समाजाच्या नात्याबाबतच्या चिंतनाला श्रीमंत करणारे हे वळण आहे. सत्य हेच आहे, की इथे मानवजातीचे प्रतिनिधित्व करणारी मानुषी खलनायिका नाही. उलट ज्या क्षणी कुहू आपले स्वत्व असे गाणेच तिच्या मोहापायी देऊन टाकतो, त्याच क्षणी तो तिच्या नजरेतून कलावंत म्हणून उतरतो. हेच ती त्याला परोपरीने सांगतेय. काय चुकले मानुषीचे? तिने त्याच्या गाण्यावर प्रेम केले. पण तोच गाणे गमावलेला काळा विद्रुप माणूस म्हणून समोर आल्यावर तिने काय म्हणून त्याच्यावर प्रेम करावे? लेखिकेची आणि इतर पक्ष्यांची सहानुभूती असेना का कुहूला. पण मानुषीचे काय चुकले? आणि हेच प्रतिकात्मक अर्थाने घेऊन बघा. मानुषी ज्याचे प्रतीक आहे त्या समाजाचे लांगुलचालन करणारे किती कलावंत असे स्वत्व विसरून घसरत गेले त्याची उदाहरणे का धायला हवी? कुहू हे अशा घसरलेल्या, स्खलित कलावंतांचे प्रतीक आहे हा अन्वयार्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. वाचकाच्या सर्जनाचे ते लक्षण आहे.
वाचकहो, हे नीट लक्षात घ्या. ज्या क्षणी लेखक कादंबरी लिहून पूर्ण करतो त्या क्षणी लेखकाचा आणि कादंबरीचा संबंध संपला. आता उरतो तो प्रातिभ आणि सर्जनशील संवाद फक्त वाचक आणि कलाकृतीमध्ये, तेव्हा लेखिका कुहूला सहानुभूती देतेय वगैरे भाग महत्त्वाचा नाहीच, तो सोडूनच द्या. आपणच कलाकृतीचे मर्म, गाभा शोधायला हवा. आणि कुहूचा गाभा कलावंताचा मूल्यर्‍हास हा आहे. उत्तम कलाकृती काही वेळा लेखकाच्या दोन पावले पुढे जाते हा तर माझा आवडताच सिद्धांत. असो. अर्थात त्याचे संपूर्ण श्रेय मात्र कविता महाजन यांच्या प्रतिभेला द्यायला हवे.
ही देखणी निर्मिती अंमळ (हे 'अंमळ' केवळ उपचार म्हणून म्हटले, खरे तर चांगलीच) महाग आहे हे मात्र खरे. त्याबाबतीत एखाद्या अधिक व्यावसायिक (प्रोफेशनल या चांगल्या अर्थाने) प्रकाशकाचे साहाय्य घेऊन काही करता आले तर फारच उत्तम. शिवाय पुस्तक आणि डीव्हीडी असे दोन्ही एकत्रच घ्यायला लावणेही जरासे खटकते. स्वतंत्र कलाकृती म्हणून दोन्ही विलक्षण सुंदर आहेत. या निर्मितीमध्ये अनेक कलावंतांचे हात गुंतलेले आहेत. मग ते धीरेश जोशी, रीमा लागू यांच्यासारखे कसलेले अभिवाचक असतील, आरती अंकलीकर यांच्यासारख्या अभिजात गायिका अन संगीतकार असतील किंवा इतर अनेक दृक-श्राव्य-मुद्रण क्षेत्रातले कलावंत असतील. नामावळी देण्यात अर्थ नाही, पण हे एक सुंदर टीमवर्क आहे. अर्थातच या सार्‍यांची कप्टन म्हणून कविता महाजन यांचे खास अभिनंदन करायला हवेच.
एका मनस्वी प्रयोगाला दाद म्हणून आपण अगदी आवर्जून (विकत घेऊन!) ही अनुभूती घ्यायला हवी.
०००
                        

Sunday, October 31, 2010

जादूचं वाक्य!

आपली मुलं बुद्धिमान बनावीत असं वाटत असेल, तर तुम्ही त्यांना परीकथा ऐकवा आणि ती सर्वश्रेष्ठ बनावीत असं वाटत असेल तर त्यांना अजून जास्त परीकथा ऐकवा! - आल्बर्ट आइन्स्टाईन 

 

आल्बर्ट आइन्स्टाईन यांचं हे 'बुद्धिमान' वाक्य तसं तर चटपटीत आहे, पण जादूचं वाक्य आहे. ते वाचताच माझ्या चेहर्‍यावर आपोआप आनंद पसरला. पालकांना मुलांकडून काय अपेक्षित असतं याची नस तर वाक्यात पकडली गेली आहेच; खेरीज आपल्याला जे सांगायचं आहे ते व्यवस्थित सांगून टाकलेलं आहे. ही चलाखी खरोखरच बुद्धिमान आहे. :-). परिकथांचं आकर्षण मला कायम वाटत आलेलं आहे. आजही लहान मुलांची 'लायब्ररी' मला जास्त भूरळ घालते. रंगीत चित्रं हे त्यातलं अजून एक आकर्षण.

ब्र प्रकाशित झाल्यानंतर एका व्याख्यानात मी ब्र मधलीच एक शतपाद किड्याची गोष्ट सांगत होते. व्याख्यान संपल्यावर जे लोक भेटायला आले त्यातल्या एका  बाईंसोबत लहान मुलगा होता. त्या त्याला सारख्या दटावत होत्या आणि बोलू देत नव्हत्या. पण तो मुलगा गर्दी ओसरेपर्यंत हट्टानं थांबून राहिला. त्यानं विचारलं," शंभर पायांचा किडा खरोखरच असतो का?" मी हो म्हटलं.  "तो तुम्ही पाहिला आहेत का?" मी पुन्हा हो म्हटलं. मग त्याची एकातून दुसरा अशी प्रश्नांची आगगाडीच सुरू झाली. त्याचा रंग कसा असतो? तो ओरडतो का? कसा आवाज काढतो? ... मी गमतीनं उत्तरं देत होते. तिथूनच परत येण्यासाठी स्टेशनवर जाणार होते म्हणून मी माझी प्रवासी सॅक पाठीवर लावली. त्यानं विचारलं,"या बॅगेत काय आहे?" मी त्याची मस्करी करावी म्हणून सांगितलं,"शंभर पायांचा किडा." झालं. कीडा दाखवा म्हणून तो हट्ट धरून बसला. त्याची आई कासावीस झाली. मी सावरून घेत म्हटलं,"तो बाहेर काढला तर पळून जाईल." " मी त्याला पकडेन." " तुला नाही पकडता येणार. तो चावतो." "मग तुम्ही कसा पकडला? तुम्हाला का नाही चावला?" "मी त्याला हळूच मानेजवळ पकडलं. तो मला चावणारच होता, पण तितक्यात त्याचं लक्ष माझ्या घड्याळाकडे गेलं. तो किती वाजले ते बघत होता, तोपर्यंत मी त्याला पटकन बॅगेत ठेवलं." मी घड्याळात वेळ पाहून घेत उत्तरले. "पण त्याला वेळ कशाला पाहायची होती?" मुलाचे पुढचे प्रश्न सुरू झाले. त्याच्याशी चार तास बोलायलाही मला आवडलं असतं, पण शक्य नव्हतं.  पुन्हा भेटेन असा शब्द देऊन मी निघाले. आणि पुढच्या सगळ्या प्रवासात मी घड्याळात वेळ बघणारा किडा आठवून मनाशी हसत होते. आपल्याला कधीच असे प्रश्न पडत नाहीत, जसे लहानपणी पडायचे. ती कल्पनाशक्ती, ती चौकसबुद्धी आपण गमावून बसलो आहोत, हे फार तीव्रतेनं जाणवलं. त्या प्रसंगापासून बच्चेकंपनी मला प्रिय झाली आणि मुलांना गोष्टी सांगणं फार मजेचं वाटू लागलं. रंग, शब्द, वास, आवाज... प्रत्येक गोष्ट मुलं किती आसुसून तीव्रतेनं अनुभवतात आणि किती लहान लहान गोष्टींमधून आनंद मिळवतात. माझी सगळ्या जगाकडे बघण्याची नजरच मुलांमध्ये राहिल्यानं बदलून गेली. हा बदल झाल्यामुळेच मी 'कुहू'सारखी कादंबरी लिहू शकले.

मराठीतलं असं लक्षात राहिलेलं पुस्तक परीकथांचं नाही, पण 'पर्‍यांच्या कवितां'चं आहे.... विंदा करंदीकरांचं 'परी ग परी.'  पाच-सहा वर्षांची असताना वाचलेलं ते पुस्तक मला आजही त्यातल्या चित्रांसह पाठ आहे.  त्यातली चित्रं पद्मा सहस्रबुद्धे यांची आहेत. पद्माबाईंचीच चित्रं असलेलं अजून एक खूप जुनं पुस्तक मला परवा माझ्या मामांनी त्यांच्या संग्रहातून काढून दिलं. ते आता बाजारात उपलब्ध नाही. पण आजही ते वाचताना फार मजा येते. सई परांजपे यांचं 'हरवलेल्या खेळण्यांचं राज्य.' 

'कुहू'ची बालआवृत्तीची चित्रं पद्माबाईंनी करावीत असं वाटत होतं. पण आता वयोमानानुसार, प्रकृतीनुसार तितकं काम त्यांना झेपणार नाही असं जाणवलं. मग निदान त्यांनी मुखपृष्ठ तरी द्यावं म्हणून मी त्यांच्याशी बोलत राहिले. पण त्यांची प्रकृती साथ देतच नव्हती. "आपण खूप उशिरा भेटलो." अशी खंत त्या सतत व्यक्त करत राहिल्या. तरी त्यांनी 'कुहू' पूर्ण वाचलं, त्याबाबत आमच्या छान गप्पा झाल्या, हेही मला पुष्कळ वाटत राहिलं.

लहानपणी परीकथा वाचताना वेगळी गंमत वाटायची आणि आता प्रौढपणी परीकथा वाचताना वेगळी गंमत वाटते. पण गंमत वाटते, हे खूप महत्त्वाचं. मग 'मोठ्यांसाठी वेगळ्या परीकथा' का असू नयेत? असा प्रश्न मनात आला. रत्नाकर मतकरी यांचं मोठ्यांसाठीच्या परीकथांचं एक लहानसं सुबक पुस्तक आठवलं. पण या कथा पुन्हा 'स्त्री-पुरुष संबंधां'भोवतीच फिरणार्‍या होत्या.

'कुहू' ही केवळ बालकादंबरी म्हणून लिहिता आली असती, पण 'मोठ्यांना नेहमी पर्यायी वास्तवच का द्यायचं? फॅन्टसी का नको?' या विचाराने 'कुहू'चा बाज गोष्टीचा / लोककथेचा राहिला तरी तिच्यात मोठ्यांना आकर्षक वाटतील अशी अनेक अद्भूत जगं हिरव्यागार गालिचासारख्या उलगडणार्‍या जंगलातून समोर येत गेली.



लाल रक्त पिवळं उन्ह

उदारहरणार्थ रक्त हा शब्द पाहू.

रक्त हा शब्द आपण पुस्तकात काळा टाइप केलेला वाचतो.
एखाद्या पोस्टरवर तो कॅलिग्राफीसह लाल रंगात छापलेला दिसतो. रक्त हा शब्द निळ्या ( रक्त ) वा हिरव्या (रक्त ) रंगात दिसला तर तितकेच तीव्र वाटेल का त्याविषयी? नाही वाटणार. अशा तडजोडी आपल्याला पटत नाहीत. मेंदू तो रंग मान्यच करत नाही.
एखाद्या व्हीडीओमध्ये, चित्रपटात रक्त वाहताना, ओघळताना दिसतं.
त्याही पलीकडे जाऊन कधीतरी रक्ताचा उष्ण ओला स्पर्श आपण प्रत्यक्ष अनुभवतो. त्याचा वास आपल्या नाकातले केस जाळतो. त्याचा साकळून काळपट होत जाणारा रंग आणि घट्ट गाठी होत जाणारा प्रवाहीपणा डोळ्यांनी अनुभवणं हा विसरता न येणारा अनुभव असतो. अनुभवात सामील होणारा कोणताही शब्द आपली त्याच्यातून सहज सुटका होऊ देत नाही.
लहानपणी खेळताना पडून फुटलेल्या गुड्घ्यातून रेषारेषांनी उमटलेलं रक्त,
भाजी चिरताना कापलेल्या बोटावर उमललेला रक्ताचा टपोरा थेंब,
मासिक पाळी सुरू झाली तेव्हा मांड्यांवर ओघळलेलं अनोळखी उष्ण रक्त,
मार खाताना खोक पडून कपाळाहून भळाभळा वाहणारं बिनकिमतीचं फुकटचं रक्त,
काहीही सहन करत पांढुरका ओठ चावल्यावर नाइलाजानं उगवलेला क्षीण रक्ताचा थेंब,
हाडांच्या मोळीला जगवण्याची धडपड करताना बाटलीतून शरीरात उतरणारं उसनं उपकाराचं रक्त,
संतापानं डोळ्यांत उतरून आलेलं रक्त...
कितीतरी आठवणी.
अश्रूंचं आपल्याला खूप कौतुक असतं लिहिताना, तितकं रक्ताचं असत नाही.
रक्ताविषयी काही बोलणंही भडकपणाचं मानलं जातं.

रक्त कसं लिहायचं? कसं रंगवायचं? माहीत नाही.
मग जे माहीत आहे त्यापासून सुरुवात करून पाहू असा विचार केला.
आणि "उन्ह" हा शब्द झगझगीत पिवळ्या रंगात लिहून पाहून मी सुरुवात केली.
दीपतात ना डोळे हे उन्ह वाचताना?




Friday, October 29, 2010

पांगळ्याला पाय फुटावेत तसं वाटतं...

माणसांना भरभरून प्रेम करता आलं पाहिजे.
आणि त्यासाठी त्यांना सकारात्मक उर्जा लाभली पाहिजे.
जी उर्जा हिरवीगार पानं देतात, रंगबिरंगी फुलं देतात, पक्षी-प्राणी देतात. रंगाने, तजेल्याने, जिवंतपणाने... त्यांच्या नुसत्या असण्या-दिसण्यानेच आपली नजर बदलते. श्वासाची लय बदलते. त्वचेचा पोत बदलतो. मन बदलतं. सुंदर काही अनुभवलं की त्याचं प्रतिबिंब आपल्या आतबाहेर असं उमटतं. आपल्या डोळ्यांत, चेहर्‍यावर, सर्वांगावर झळकतं. आपल्या हालचालीतून, बोलण्या-वागण्यातून उमलून यायला लागतं. आपण सुंदर दिसायला लागतो. आपल्यातला कुरूप भाग आपल्याला जाणवतही नाही. त्या बटबटीत देठावर, त्याच्या बळावरच एक इवलंसं देखणं फूल उमलून निवांत झुलू डुलू शकतं. आपला सुगंध दूरवर पसरवू शकतं. फुलांचे हे निळे जांभळे लाल केशरी पांढरे पिवळे दिवे किती प्रकाश पसरवतात. इवल्या इवल्या अवकाशाचे तुकडे उजळवतात. प्रसन्न करतात. सांगतात की जग सुंदर आहे.
मग माणूस आपले शब्द, आपले रंग, आपले सूर, आपले स्पर्श वापरून आपल्या मनासह आपल्या आसपासचा अवकाश उजळवू शकत नाही का?
प्रेमात प्रचंड जादू असते.
प्रिय व्यक्तीचा खूप दूरवरून नुसता आवाज कानी पडला तरी पांगळ्याला पाय फुटावेत तसं वाटतं.
ही उत्कटता अनुभवायला माणसं का संकोचतात? प्रेम या नुसत्या शब्दानंही का आक्रसतात?
....................
कुहू सारखा एक इवला पक्षी मानुषी नावाच्या मानवी मुलीच्या प्रेमात पडतो, तेव्हा असे सारे प्रश्न त्याला पडणारच.

Thursday, October 28, 2010

पुस्तकं निर्णय घ्यायला मदत करतात, ती अशी...

वॉल्ट डिस्ने वर यशवंत रांजणकर यांनी लिहिलेलं पुस्तक वाचत होते. कुहूचं काम सुरू असतानाच ते हाताशी आलं होतं. त्यामुळे 'कर्ज' या गोष्टीकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. पुस्तकं एखादा निर्णय घ्यायलाही मदत करतात ती अशी.
त्यातली दोन-तीन विधाने मला महत्त्वाची वाटली, ती अशी आहेत...

० "लोक ज्या जगात राहतात, ते त्यांना माझ्या पार्कमध्ये असताना दिसता कामा नये. इथं आपण सर्वस्वी वेगळ्याच जगात आहोत, असंच त्यांना सतत वाटत राहिलं पाहिजे. " - हे वाक्य वाचलं आणि 'कुहू'मध्ये माणसांचं जग वगळून निव्वळ जंगल दाखवण्याचा निर्णय मला पटला.
'कुहू'चं एक वाचन मी उमा कुलकर्णींकडे केलं होतं. तेव्हा विरुपाक्ष कुलकर्णी म्हणाले होते की, "माणसांच्या जगात त्या धुरात, गोंगाटात, कोलाहलात आम्हांला यायचं नाहीये. कशाला त्या कुहूला तेवढ्यासाठी शहरात आणतेस?"
आणि मग कुहू शहरात येतो हा प्रसंग तर तसाच ठेवला, पण जागा बदलली आणि कुहू मानुषीला जंगलातल्या डॉरमिटरीतच भेटतो, असा बदल केला.
हा बदल करण्यामागे अजून एक कारण होतं ते चित्रशैलीचं. शहरात हा प्रसंग 'कॅरिकेचर्स' सारखा झाला होता. तीव्र उपरोध या कादंबरीच्या बाकीच्या भाषेशी विसंगत आहे, हे ध्यानात आलं. यातली गंमत अशी की ते ध्यानात येण्याला माझी ऑइल कलर्स मधली चित्रं निमित्त ठरली.
डिस्नेनं म्हटलं होतं," कल्पना आणि वास्तव यांच्या दरम्यान उभं असताना आपल्याला एकाच वेळी दोघांनाही कवेत घेता आलं पाहिजे. कला आणि विज्ञान यांनी एक होण्याची वेळ आली आहे." 
कुहूचं लेखन पूर्ण झाल्यानंतर निर्मितीचं काम करताना या शब्दांचा पडताळा सतत येत होता.
अशा लोकोत्तर माणसांची चरित्रं पुढच्या अनेक पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरतात.


Wednesday, October 27, 2010

वागणं आणि वर्तन

माणसाचं वागणं हे माणसाचं वर्तन बनायला सुरुवात होते, ती त्याच्या 'विकासा'ची निदर्शक मानली जाते. मात्र या तथाकथित विकासाच्या प्रक्रियेत आपण आपली नैसर्गिक सहजता कशी गमावून बसतो, हे माणसाच्या ध्यानातही येत नाही.
एकदा एका कॉन्फरन्सला गेलेली असताना टी-ब्रेक मध्ये सारे गप्पा मारत होते, तेव्हा मी खळखळून हसले आणि सगळे दचकून माझ्याकडे पहायला लागले. मी दुर्लक्ष करून माझ्या गप्पा सुरू ठेवल्या. थोड्याच वेळात एक आसामी भाषेतले समीक्षक आणि त्यांची पत्नी माझ्याजवळ ओळख करून घ्यायला आले. मग त्या बाई म्हणाल्या,"मी आयुष्यात पहिल्यांदाच अशी इतकी खळखळून हसणारी बाई पाहिली."
मी म्हटलं,"लोक वेडी म्हणतात इतकं हसल्यानं."
त्या उत्तरल्या,"म्हणू देत. पण तू हसलीस तरी मला किती बरं वाटलं म्हणून सांगू... मला कधीच असं हसता येणार नाही."
त्यांचा स्मित हास्य करत बाजूला उभा असलेला नवरा म्हणाला,"मलाही! म्हणजे आम्हांला कुणी अडवलं नाहीये. आणि आम्ही एक सुखी जोडपं आहोत. तरी आज तुला हसताना पाहून हे आमच्या पहिल्यांदाच लक्षात आलं की आम्ही काय मिस करतोय. म्हणून तुझी ओळख करून घेतली."
शिष्टाचारांचं जेव्हा ओझं व्हायला लागतं, तेव्हा माणसांना ते फेकून द्यावं वाटतंच. शिष्टाचारांपायी माणसं इतकी 'कॉन्शस' होतात की आपले साधे सहज आनंद गमावून बसतात. हसणं, बोलणं, रडणं, चिडणं, नाचणं, गाणं... सगळ्याचं 'शास्त्र' बनतं. चौकट बनते. आणि त्या चौकटीत स्वतःला कोंबून बसवण्यासाठी माणसं स्वतःला आणि दुसर्‍यांनाही कापून, कातून, कोरून काढायला लागतात.
अशा विचारांमधून मला एकदा टोकाचं वाटलं की,"नैसर्गिक वागणं हेच आता सभ्य माणसांना अनैसर्गिक वाटू लागलं आहे."
मी 'कुहू'च्या जवळ जाण्याची सुरुवात याच भावनेपासून झाली.
"मैत्री, आपुलकी, प्रेम अशा भावना व्यक्त करणार्‍यांना आता समुपदेशकाकडे किंवा मनोरोगतज्ञांकडे जा, असं सांगण्याचे दिवस आले आहेत." हा विचार मन उदास करून टाकणारा होता.