Sunday, October 31, 2010

लाल रक्त पिवळं उन्ह

उदारहरणार्थ रक्त हा शब्द पाहू.

रक्त हा शब्द आपण पुस्तकात काळा टाइप केलेला वाचतो.
एखाद्या पोस्टरवर तो कॅलिग्राफीसह लाल रंगात छापलेला दिसतो. रक्त हा शब्द निळ्या ( रक्त ) वा हिरव्या (रक्त ) रंगात दिसला तर तितकेच तीव्र वाटेल का त्याविषयी? नाही वाटणार. अशा तडजोडी आपल्याला पटत नाहीत. मेंदू तो रंग मान्यच करत नाही.
एखाद्या व्हीडीओमध्ये, चित्रपटात रक्त वाहताना, ओघळताना दिसतं.
त्याही पलीकडे जाऊन कधीतरी रक्ताचा उष्ण ओला स्पर्श आपण प्रत्यक्ष अनुभवतो. त्याचा वास आपल्या नाकातले केस जाळतो. त्याचा साकळून काळपट होत जाणारा रंग आणि घट्ट गाठी होत जाणारा प्रवाहीपणा डोळ्यांनी अनुभवणं हा विसरता न येणारा अनुभव असतो. अनुभवात सामील होणारा कोणताही शब्द आपली त्याच्यातून सहज सुटका होऊ देत नाही.
लहानपणी खेळताना पडून फुटलेल्या गुड्घ्यातून रेषारेषांनी उमटलेलं रक्त,
भाजी चिरताना कापलेल्या बोटावर उमललेला रक्ताचा टपोरा थेंब,
मासिक पाळी सुरू झाली तेव्हा मांड्यांवर ओघळलेलं अनोळखी उष्ण रक्त,
मार खाताना खोक पडून कपाळाहून भळाभळा वाहणारं बिनकिमतीचं फुकटचं रक्त,
काहीही सहन करत पांढुरका ओठ चावल्यावर नाइलाजानं उगवलेला क्षीण रक्ताचा थेंब,
हाडांच्या मोळीला जगवण्याची धडपड करताना बाटलीतून शरीरात उतरणारं उसनं उपकाराचं रक्त,
संतापानं डोळ्यांत उतरून आलेलं रक्त...
कितीतरी आठवणी.
अश्रूंचं आपल्याला खूप कौतुक असतं लिहिताना, तितकं रक्ताचं असत नाही.
रक्ताविषयी काही बोलणंही भडकपणाचं मानलं जातं.

रक्त कसं लिहायचं? कसं रंगवायचं? माहीत नाही.
मग जे माहीत आहे त्यापासून सुरुवात करून पाहू असा विचार केला.
आणि "उन्ह" हा शब्द झगझगीत पिवळ्या रंगात लिहून पाहून मी सुरुवात केली.
दीपतात ना डोळे हे उन्ह वाचताना?
2 comments:

Yeshwant said...

खूप छान.. कवितेसारखे वाटले हे स्फुट मला.

Dhananjay said...

खूपच छान! कल्पना आवडली. उन्हाने डोळे दिपले. प्रत्येक शब्दामागे असा एक लपलेला रंग असू शकतो हा विचार केला नव्हता. काही सहज सुचलेले शब्द: विरक्त , शांत , वसुंधरा , कावळा/ कावळा, इंद्रधनुष्य...