Wednesday, October 27, 2010

वागणं आणि वर्तन

माणसाचं वागणं हे माणसाचं वर्तन बनायला सुरुवात होते, ती त्याच्या 'विकासा'ची निदर्शक मानली जाते. मात्र या तथाकथित विकासाच्या प्रक्रियेत आपण आपली नैसर्गिक सहजता कशी गमावून बसतो, हे माणसाच्या ध्यानातही येत नाही.
एकदा एका कॉन्फरन्सला गेलेली असताना टी-ब्रेक मध्ये सारे गप्पा मारत होते, तेव्हा मी खळखळून हसले आणि सगळे दचकून माझ्याकडे पहायला लागले. मी दुर्लक्ष करून माझ्या गप्पा सुरू ठेवल्या. थोड्याच वेळात एक आसामी भाषेतले समीक्षक आणि त्यांची पत्नी माझ्याजवळ ओळख करून घ्यायला आले. मग त्या बाई म्हणाल्या,"मी आयुष्यात पहिल्यांदाच अशी इतकी खळखळून हसणारी बाई पाहिली."
मी म्हटलं,"लोक वेडी म्हणतात इतकं हसल्यानं."
त्या उत्तरल्या,"म्हणू देत. पण तू हसलीस तरी मला किती बरं वाटलं म्हणून सांगू... मला कधीच असं हसता येणार नाही."
त्यांचा स्मित हास्य करत बाजूला उभा असलेला नवरा म्हणाला,"मलाही! म्हणजे आम्हांला कुणी अडवलं नाहीये. आणि आम्ही एक सुखी जोडपं आहोत. तरी आज तुला हसताना पाहून हे आमच्या पहिल्यांदाच लक्षात आलं की आम्ही काय मिस करतोय. म्हणून तुझी ओळख करून घेतली."
शिष्टाचारांचं जेव्हा ओझं व्हायला लागतं, तेव्हा माणसांना ते फेकून द्यावं वाटतंच. शिष्टाचारांपायी माणसं इतकी 'कॉन्शस' होतात की आपले साधे सहज आनंद गमावून बसतात. हसणं, बोलणं, रडणं, चिडणं, नाचणं, गाणं... सगळ्याचं 'शास्त्र' बनतं. चौकट बनते. आणि त्या चौकटीत स्वतःला कोंबून बसवण्यासाठी माणसं स्वतःला आणि दुसर्‍यांनाही कापून, कातून, कोरून काढायला लागतात.
अशा विचारांमधून मला एकदा टोकाचं वाटलं की,"नैसर्गिक वागणं हेच आता सभ्य माणसांना अनैसर्गिक वाटू लागलं आहे."
मी 'कुहू'च्या जवळ जाण्याची सुरुवात याच भावनेपासून झाली.
"मैत्री, आपुलकी, प्रेम अशा भावना व्यक्त करणार्‍यांना आता समुपदेशकाकडे किंवा मनोरोगतज्ञांकडे जा, असं सांगण्याचे दिवस आले आहेत." हा विचार मन उदास करून टाकणारा होता.

3 comments:

Mangala said...

"मैत्री, आपुलकी, प्रेम अशा भावना व्यक्त करणार्‍यांना आता समुपदेशकाकडे किंवा मनोरोगतज्ञांकडे जा, असं सांगण्याचे दिवस आले आहेत."
हे अगदी खरे सांगितलेस ताई तू! या शिष्टचारांच्या जगात जीव गुदमरतो.खळाळून हसणे हाच तर खरा दागिना आहे आपला आणि तो बाजूला ठेऊन सारे काहीं कृत्रिम जिवन वाटते.!

Chitra Rajendra Joshi said...

कविता,
‘आयुष्यातील प्रत्येक क्षण आसुसून कसा जगायचा’ हे शिकावं तुझ्याकडून...
सुखी आणि दु:खी दोन्ही क्षणांना दाद देणारं तुझं खळखळणारं हसू
आणि
‘कवितां’समवेत दु:खांना वाट करून देणारे तुझे झणझणीत शब्द...
आणि
‘कुहू‘ समवेत खुलणारे तुझे मोहक रंग....
सारं काही आम्हाला हवंहवंसंऽऽऽऽऽ

Yeshwant said...

खूप छान कविता. अगदी आपल्या आत झोकून विचार करायला लावलं इतकुशा लेखानं.