Thursday, October 28, 2010

पुस्तकं निर्णय घ्यायला मदत करतात, ती अशी...

वॉल्ट डिस्ने वर यशवंत रांजणकर यांनी लिहिलेलं पुस्तक वाचत होते. कुहूचं काम सुरू असतानाच ते हाताशी आलं होतं. त्यामुळे 'कर्ज' या गोष्टीकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. पुस्तकं एखादा निर्णय घ्यायलाही मदत करतात ती अशी.
त्यातली दोन-तीन विधाने मला महत्त्वाची वाटली, ती अशी आहेत...

० "लोक ज्या जगात राहतात, ते त्यांना माझ्या पार्कमध्ये असताना दिसता कामा नये. इथं आपण सर्वस्वी वेगळ्याच जगात आहोत, असंच त्यांना सतत वाटत राहिलं पाहिजे. " - हे वाक्य वाचलं आणि 'कुहू'मध्ये माणसांचं जग वगळून निव्वळ जंगल दाखवण्याचा निर्णय मला पटला.
'कुहू'चं एक वाचन मी उमा कुलकर्णींकडे केलं होतं. तेव्हा विरुपाक्ष कुलकर्णी म्हणाले होते की, "माणसांच्या जगात त्या धुरात, गोंगाटात, कोलाहलात आम्हांला यायचं नाहीये. कशाला त्या कुहूला तेवढ्यासाठी शहरात आणतेस?"
आणि मग कुहू शहरात येतो हा प्रसंग तर तसाच ठेवला, पण जागा बदलली आणि कुहू मानुषीला जंगलातल्या डॉरमिटरीतच भेटतो, असा बदल केला.
हा बदल करण्यामागे अजून एक कारण होतं ते चित्रशैलीचं. शहरात हा प्रसंग 'कॅरिकेचर्स' सारखा झाला होता. तीव्र उपरोध या कादंबरीच्या बाकीच्या भाषेशी विसंगत आहे, हे ध्यानात आलं. यातली गंमत अशी की ते ध्यानात येण्याला माझी ऑइल कलर्स मधली चित्रं निमित्त ठरली.
डिस्नेनं म्हटलं होतं," कल्पना आणि वास्तव यांच्या दरम्यान उभं असताना आपल्याला एकाच वेळी दोघांनाही कवेत घेता आलं पाहिजे. कला आणि विज्ञान यांनी एक होण्याची वेळ आली आहे." 
कुहूचं लेखन पूर्ण झाल्यानंतर निर्मितीचं काम करताना या शब्दांचा पडताळा सतत येत होता.
अशा लोकोत्तर माणसांची चरित्रं पुढच्या अनेक पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरतात.


3 comments:

Mangala said...

पुस्तक निर्णय घ्यायला मदत करतात,हा आपला अनुभव वाचून आता मी ही नक्की वाचन वाढवेन. आपण किती विचारपूर्वक लिखाण आणि कृती करता ते यातून कळले. कल्पना आणि वास्तव दोहोनाही कवेत घेणं,भावलं मनाला!

Chitra Rajendra Joshi said...

कविता,
पुस्तकं निर्णय घ्यायला मदत करतात हे तर खरं आहेच! आणि तू तुझ्या कृतींतून तो
निर्णय वास्तवात कसा आणायचा ह्याचे प्रात्यक्षिकसुद्धा देते आहेस... आमचं भाग्य हे आहे की आपण एकाच पिढीचे आहोत. त्यामुळे तू सतत नजरेसमोर आहेस....
अंधारलेल्या वाटेवर प्रकाश दाखवणा~या प्रखर दिव्याप्रमाणे.........

Yeshwant said...

नक्कीचं मदत करतात पुस्तके!!!! तू लिहिलेल्या दोन्ही लेखकांच्या पुस्तकाची नांवे मला हवी आहेत, मीही वाचेन.