Sunday, October 31, 2010

जादूचं वाक्य!

आपली मुलं बुद्धिमान बनावीत असं वाटत असेल, तर तुम्ही त्यांना परीकथा ऐकवा आणि ती सर्वश्रेष्ठ बनावीत असं वाटत असेल तर त्यांना अजून जास्त परीकथा ऐकवा! - आल्बर्ट आइन्स्टाईन 

 

आल्बर्ट आइन्स्टाईन यांचं हे 'बुद्धिमान' वाक्य तसं तर चटपटीत आहे, पण जादूचं वाक्य आहे. ते वाचताच माझ्या चेहर्‍यावर आपोआप आनंद पसरला. पालकांना मुलांकडून काय अपेक्षित असतं याची नस तर वाक्यात पकडली गेली आहेच; खेरीज आपल्याला जे सांगायचं आहे ते व्यवस्थित सांगून टाकलेलं आहे. ही चलाखी खरोखरच बुद्धिमान आहे. :-). परिकथांचं आकर्षण मला कायम वाटत आलेलं आहे. आजही लहान मुलांची 'लायब्ररी' मला जास्त भूरळ घालते. रंगीत चित्रं हे त्यातलं अजून एक आकर्षण.

ब्र प्रकाशित झाल्यानंतर एका व्याख्यानात मी ब्र मधलीच एक शतपाद किड्याची गोष्ट सांगत होते. व्याख्यान संपल्यावर जे लोक भेटायला आले त्यातल्या एका  बाईंसोबत लहान मुलगा होता. त्या त्याला सारख्या दटावत होत्या आणि बोलू देत नव्हत्या. पण तो मुलगा गर्दी ओसरेपर्यंत हट्टानं थांबून राहिला. त्यानं विचारलं," शंभर पायांचा किडा खरोखरच असतो का?" मी हो म्हटलं.  "तो तुम्ही पाहिला आहेत का?" मी पुन्हा हो म्हटलं. मग त्याची एकातून दुसरा अशी प्रश्नांची आगगाडीच सुरू झाली. त्याचा रंग कसा असतो? तो ओरडतो का? कसा आवाज काढतो? ... मी गमतीनं उत्तरं देत होते. तिथूनच परत येण्यासाठी स्टेशनवर जाणार होते म्हणून मी माझी प्रवासी सॅक पाठीवर लावली. त्यानं विचारलं,"या बॅगेत काय आहे?" मी त्याची मस्करी करावी म्हणून सांगितलं,"शंभर पायांचा किडा." झालं. कीडा दाखवा म्हणून तो हट्ट धरून बसला. त्याची आई कासावीस झाली. मी सावरून घेत म्हटलं,"तो बाहेर काढला तर पळून जाईल." " मी त्याला पकडेन." " तुला नाही पकडता येणार. तो चावतो." "मग तुम्ही कसा पकडला? तुम्हाला का नाही चावला?" "मी त्याला हळूच मानेजवळ पकडलं. तो मला चावणारच होता, पण तितक्यात त्याचं लक्ष माझ्या घड्याळाकडे गेलं. तो किती वाजले ते बघत होता, तोपर्यंत मी त्याला पटकन बॅगेत ठेवलं." मी घड्याळात वेळ पाहून घेत उत्तरले. "पण त्याला वेळ कशाला पाहायची होती?" मुलाचे पुढचे प्रश्न सुरू झाले. त्याच्याशी चार तास बोलायलाही मला आवडलं असतं, पण शक्य नव्हतं.  पुन्हा भेटेन असा शब्द देऊन मी निघाले. आणि पुढच्या सगळ्या प्रवासात मी घड्याळात वेळ बघणारा किडा आठवून मनाशी हसत होते. आपल्याला कधीच असे प्रश्न पडत नाहीत, जसे लहानपणी पडायचे. ती कल्पनाशक्ती, ती चौकसबुद्धी आपण गमावून बसलो आहोत, हे फार तीव्रतेनं जाणवलं. त्या प्रसंगापासून बच्चेकंपनी मला प्रिय झाली आणि मुलांना गोष्टी सांगणं फार मजेचं वाटू लागलं. रंग, शब्द, वास, आवाज... प्रत्येक गोष्ट मुलं किती आसुसून तीव्रतेनं अनुभवतात आणि किती लहान लहान गोष्टींमधून आनंद मिळवतात. माझी सगळ्या जगाकडे बघण्याची नजरच मुलांमध्ये राहिल्यानं बदलून गेली. हा बदल झाल्यामुळेच मी 'कुहू'सारखी कादंबरी लिहू शकले.

मराठीतलं असं लक्षात राहिलेलं पुस्तक परीकथांचं नाही, पण 'पर्‍यांच्या कवितां'चं आहे.... विंदा करंदीकरांचं 'परी ग परी.'  पाच-सहा वर्षांची असताना वाचलेलं ते पुस्तक मला आजही त्यातल्या चित्रांसह पाठ आहे.  त्यातली चित्रं पद्मा सहस्रबुद्धे यांची आहेत. पद्माबाईंचीच चित्रं असलेलं अजून एक खूप जुनं पुस्तक मला परवा माझ्या मामांनी त्यांच्या संग्रहातून काढून दिलं. ते आता बाजारात उपलब्ध नाही. पण आजही ते वाचताना फार मजा येते. सई परांजपे यांचं 'हरवलेल्या खेळण्यांचं राज्य.' 

'कुहू'ची बालआवृत्तीची चित्रं पद्माबाईंनी करावीत असं वाटत होतं. पण आता वयोमानानुसार, प्रकृतीनुसार तितकं काम त्यांना झेपणार नाही असं जाणवलं. मग निदान त्यांनी मुखपृष्ठ तरी द्यावं म्हणून मी त्यांच्याशी बोलत राहिले. पण त्यांची प्रकृती साथ देतच नव्हती. "आपण खूप उशिरा भेटलो." अशी खंत त्या सतत व्यक्त करत राहिल्या. तरी त्यांनी 'कुहू' पूर्ण वाचलं, त्याबाबत आमच्या छान गप्पा झाल्या, हेही मला पुष्कळ वाटत राहिलं.

लहानपणी परीकथा वाचताना वेगळी गंमत वाटायची आणि आता प्रौढपणी परीकथा वाचताना वेगळी गंमत वाटते. पण गंमत वाटते, हे खूप महत्त्वाचं. मग 'मोठ्यांसाठी वेगळ्या परीकथा' का असू नयेत? असा प्रश्न मनात आला. रत्नाकर मतकरी यांचं मोठ्यांसाठीच्या परीकथांचं एक लहानसं सुबक पुस्तक आठवलं. पण या कथा पुन्हा 'स्त्री-पुरुष संबंधां'भोवतीच फिरणार्‍या होत्या.

'कुहू' ही केवळ बालकादंबरी म्हणून लिहिता आली असती, पण 'मोठ्यांना नेहमी पर्यायी वास्तवच का द्यायचं? फॅन्टसी का नको?' या विचाराने 'कुहू'चा बाज गोष्टीचा / लोककथेचा राहिला तरी तिच्यात मोठ्यांना आकर्षक वाटतील अशी अनेक अद्भूत जगं हिरव्यागार गालिचासारख्या उलगडणार्‍या जंगलातून समोर येत गेली.



4 comments:

Abhijit Bhatlekar said...
This comment has been removed by the author.
Abhijit Bhatlekar said...

Totally agree with you. I have been waiting eagerly for Fairy Tales, especially after I grew up..!!

Travellers Ravellers said...

agree totally ... imagination and creativity has to be encouraged - only now we call it out of the box thinking:)
jargons make cliches and cliches cloud creativity - nahi ka?

अपर्णा said...

मला अजूनही परीकथा काय सगळ्या लहान मुलांच्या गोष्टी आवडतात..कदाचित म्हणून माझ्या मुलांना मी खूप पुस्तक आणून वाचून दाखवते...

त्यांना पडणारे प्रश्न आणि त्यातल्या चित्रांमधली त्याची observations खरच पाहण्यासारखी असतात...एका गोष्टीमधली मुलगी अस्वल कुटुंब पाहून पळताना तिची चप्पल त्यांच्या घरात विसरते हे चित्रात पाहून माझ्या मुलाने बरंच त्या विषयी खल केला होता...:)